इराण, इंधन आणि लेबेनॉनच्या मुद्यावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि सौदीच्या क्राऊन प्रिन्समध्ये चर्चा

पॅरिस – युरोपच्या दौऱ्यावर असलेले सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये इंधनटंचाईचा प्रश्न, इराणचा अणुकरार आणि लेबेनॉनमधील परिस्थितीवर चर्चा पार पडली. दरम्यान, पत्रकार जमाल खशोगीची हत्या आणि मानवाधिकारांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्सची भेट घेऊ नये, अशी मागणी फ्रान्समधून करण्यात आली होती. पण प्रिन्स मोहम्मद यांचे रेड कॉर्पेट स्वागत केल्यामुळे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर टीका होत आहे.

macron-mbsगेल्या काही दिवसांपासून युरोपच्या दौऱ्यावर असलेले सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान गुरुवारी फ्रान्समध्ये दाखल झाले. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याबरोबर झालेल्या भेटीत क्षेत्रीय तसेच आंतरराष्ट्रीय हालचालींवर प्रिन्स मोहम्मद यांनी प्रदीर्घ चर्चा केली. यामध्ये इराणच्या अणुकराराबरोबरच इराक, सिरिया, येमेन आणि लेबेनॉन या देशांमधील इराणचा वाढता प्रभाव यावर सौदीने आपली भूमिका मांडली. या अरब देशांमधील इराणच्या वाढत्या प्रभावामुळे सौदी अरेबियाच्या सुरक्षेला धोका असल्याचे प्रिन्स मोहम्मद यांनी लक्षात आणून दिले.

तर युक्रेन युद्धामुळे इंधनाच्या तीव्र संकटाला सामोरे जाणाऱ्या फ्रान्ससाठी प्रिन्स मोहम्मद यांची ही भेट अतिशय महत्त्वाची असल्याचा दावा केला जातो. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्ससोबत इंधनाच्या सहकार्यावर चर्चा केली. युक्रेनच्या युद्धामुळे निर्माण झालेली इंधनाची समस्या सोडविण्यासाठी प्रिन्स मोहम्मद यांच्यावर बरेच काही अवलंबून असल्याचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले. इंधन उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’वरील सौदीचा प्रभाव लक्षात घेता, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रिन्स मोहम्मद यांना केलेले विधान लक्षवेधी ठरते.

दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सौदी अरेबियाचा दौरा करून प्रिन्स मोहम्मद यांची भेट घेतली होती. तसेच इंधन उत्पादक आखाती देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा करून इंधनाचे उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले होते. पण बायडेन यांचा सौदी दौरा अपयशी ठरल्याची टीका अमेरिकन माध्यमांनी केली होती. याउलट फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्ससोबत इंधन सहकार्यावर यशस्वी चर्चा केल्याचे अमेरिकन माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply