युरोपच्या भविष्याच्या मुद्यावर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा गंभीर इशारा

SPAIN-FRANCE-POLITICS-DIPLOMACYमाद्रिद/पॅरिस – युक्रेनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युरोपला अभूतपूर्व संकटाला तोंड द्यावे लागत आहे. येणाऱ्या काळात स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे की चीन किंवा अमेरिकेचे आश्रित व्हायचे याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असा गंभीर इशारा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिला. युक्रेनमधील संघर्षामुळे युक्रेनच्या आर्थिक व व्यापारी रचनेवर थेट तसेच अप्रत्यक्ष परिणाम होत असल्याचेही फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी बजावले. आपल्या स्पेन दौऱ्यात दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी अमेरिकेच्या धोरणांवरही टीकास्त्र सोडले.

गेल्या काही वर्षात फ्रान्सने युरोपातील आघाडीच्या देशांशी स्वतंत्र पातळीवर सहकार्य करार करण्याचे धोरण राबविले आहे. याअंतर्गत ब्रिटन, जर्मनी व आता स्पेनबरोबर सहकार्याचा करार करण्यात आला. या करारासाठी स्पेन भेटीवर असलेल्या मॅक्रॉन यांनी युरोपच्या भवितव्याच्या मुद्यावर आक्रमक भूमिका मांडली. युक्रेन संघर्षामुळे युरोपला मोठ्या परिणामांचा सामना करावा लागत असल्याची जाणीव त्यांनी यावेळी करून दिली.

france-strikeव्यापाराच्या पातळीवर जग अमेरिका व चीन या ध्रुवांमध्ये विभागले जात असून यापैकी कोणाचे आश्रित व्हायचे याचा निर्णय युरोपने अद्याप घेतलेला नाही. आश्रित व्हायचे नसेल तर स्वतंत्र व सार्वभौम युरोपसाठीचे निर्णय लवकरच घ्यावे लागतील, याकडे मॅक्रॉन यांनी लक्ष वेधले. युरोपने अर्थ, तंत्रज्ञान व लष्करीदृष्ट्या स्वतंत्र आणि सार्वभौमच असायला हवे, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. रशियाच्या मुद्यावर आपले मत मांडताना या देशाचा इतिहास व भौगोलिक स्थान लक्षात घेऊन पावले उचलायला हवीत, असा सल्लाही त्यांनी दिला. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने घेतलेल्या काही निर्णयांवरही टीकास्त्र सोडले. अमेरिकेचे निर्णय युरोपमधील औद्योगिकीकरण संपविणारे असल्याची टीका मॅक्रॉन यांनी केली.

दरम्यान, फ्रान्समध्ये मॅक्रॉन यांच्या धोरणांविरोधात कामगार संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे समोर आले आहे. फ्रान्सच्या विविध शहरांमधून जवळपास 10 लाखांहून अधिक नागरिक रस्त्यावर उतरल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी विविध क्षेत्रातील कर्मचारी वाढत्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होत असल्याने रेल्वे व इतर जीवनावश्यक सेवा विस्कळीत झाल्याची माहिती फ्रेंच माध्यमांनी दिली. राजधानी पॅरिस व इतर काही शहरांमध्ये फ्रेंच सुरक्षा यंत्रणांनी आंदोलकांविरोधात अश्रुधुराचा वापर केल्याचेही सांगण्यात येते.

leave a reply