युएई, ऑस्ट्रेलियाबरोबरील मुक्त व्यापारी करारांमुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

चेन्नई – ‘युएई व ऑस्ट्रेलिया या देशांबरोबरील भारताने केलेले मुक्त व्यापारी करार देशाच्या आर्थिक विकासाला गतीमान करणारे ठरतील. उद्योगक्षेत्राने याचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा. यासंदर्भातील कुठल्याही अडचणी आल्यास, त्यांनी सरकारशी थेट संपर्क साधावा’ असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. युक्रेनच्या युद्धामुळे सध्या समोर अडचणी दिसत असल्या, तरी निर्यातीसाठी यामुळे नव्या संधीही समोर आलेल्या आहेत, याकडे उद्योगक्षेत्राने लक्ष द्यावे, असा संदेश अर्थमंत्री सीतारामन यांनी दिला. चेन्नईमध्ये पार पडलेल्या ‘स्टेकहोल्डर्स आऊटरिच प्रोग्राम ऑन ट्रेड ॲग्रीमेंटस्‌‍’ या कार्यक्रमात अर्थमंत्री बोलत होत्या. युएई व ऑस्ट्रेलिया यांच्याशी झालेल्या मुक्त व्यापारी करारांची माहिती अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करीत आहे.

देशाच्या आर्थिक विकासालायामुळे सदर कराराचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांबरोबरच निर्यातीशी निगडीत असलेले अनेकजण पुढे येतील, असा विश्वास केंद्रीय अर्थंमत्र्यांनी व्यक्त केलाआहे. या करारांमुळे नव्या बाजारपेठा भारतीय उद्योजकांना उपलब्ध झाल्या आहेत. ही संधी साधण्यासाठी आपला उद्योग नव्या उंचीवर नेण्याची तयारी करा, असे आवाहन यावेळी सीतारामन यांनी केले.

या देशांमध्ये आपल्याला निर्यात वाढवायची असेल, तर कच्च्या मालासाठी आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहता येणार नाही. या कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीसाठी उद्योजकांना राज्यांनी आवश्यक ते सहाय्य करायला हवे, याचीही जाणीव केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी करून दिली. ऑस्ट्रेलियाबरोबरील भारताचा मुक्त व्यापारी करार केवळ दोन देशांसाठीच नाही तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी उपकारक ठरेल, असेही सीतारामन पुढे म्हणाल्या. दरम्यान, मुक्त व्यापारी करारामुळे पुढच्या पाच वर्षात भारत-युएईचा द्विपक्षीय व्यापार दुपटीने वाढेल, असे वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटले आहे.

तर ऑस्ट्रेलियाशी भारताने केलेला मुक्त व्यापारी करार म्हणजे विकसित देशांना भारताबरोबरील व्यापारी भागीदारीसाठी मिळालेला संदेश असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे.

leave a reply