श्रीनगरमध्ये जी२०ची बैठक सुरू

श्रीनगर – चीन, तुर्की आणि सौदी अरेबिया या देशांनी श्रीनगरमधील जी२०च्या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला. तरीही जम्मू व काश्मीरच्या श्रीनगरमधील जी२०ची ही बैठक जल्लोषात सुरू झाल्याचे दिसत आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भूभाग आहे, हे या बैठकीचे आयोजन करून भारताने साऱ्या जगाला दाखवून दिले. त्याचवेळी बहिष्कार टाकल्यानंतरही या बैठकीच्या यशावर त्याचा परिणाम झालेला नाही, असा संदेश भारताने चीन व तुर्कीसारख्या देशांना दिला आहे.

श्रीनगरमध्ये जी२०ची बैठक सुरूजम्मू व काश्मीर हा वादग्रस्त भूभाग आहे, असा दावा करून चीनने या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला होता. याआधी अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जी२० च्या बैठकीवरही चीनने अशारितीने बहिष्कार टाकला होता. मात्र भारताने त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. श्रीनगरमधील सदर बैठकीमधील चीनच्या अनुपस्थितीलाही भारताने किंमत दिलेली नाही. तसेच तुर्की व सौदी अरेबियाने या बैठकीतून माघार घेतली, तरी ही बैठक जल्लोषात सुरू झाल्याचे दिसत आहे.

या जल्लोषात स्थानिकांच्या उत्साहाचा फार मोठा वाटा आहे. भारत काश्मीरच्या जनतेवर अत्याचार करीत असल्याचा कांगावा पाकिस्तानसारखा देश सातत्याने करीत आला आहे. काही काळापर्यंत आंतरराष्ट्रीय समुदायाने व भारतविरोधी शक्तींनी पाकिस्तानचे हे आरोप उचलून धरले होते. पण जी२०ला मिळत असलेला स्थानिकांचा प्रतिसाद पाहता भारताच्या विरोधातील अपप्रचाराला जोरदार प्रत्युत्तर मिळत असल्याचे दिसते, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.

जी२०च्या सदस्यदेशांचे शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे आणि यात सहभागी झालेले सारेजण स्वतःच्या डोळ्यांनी इथली परिस्थिती पाहत आहेत, याकडे सिंग यांनी लक्ष वेधले. जम्मू व काश्मीरमध्ये विकासाची घोडदौड सुरू झाली असून यामुळे स्थानिकांचा उत्साह अधिकच वाढला आहे. आम्हाला विकास हवा आहे, दहशतवाद नको, अशा घोषणा इथले स्थानिक तरुण देत आहेत. त्याचवेळी पाकिस्तानशी आमचे काहीही देणेघेणे नाही, असे काश्मिरी तरुण निक्षून सांगत आहेत. इतकेच नाही तर आपल्याकडे झालेल्या विकासाचे फोटोग्राफ्स व व्हिडिओज्‌‍ सोशल मीडियावर शेअर करून काश्मिरी विद्यार्थीवर्ग पाकिस्तानला समज देत आहेत.

ही सारी परिस्थितीत जी२० देशांच्या समोर येऊ नये, यासाठी पाकिस्तानने शर्थीचे प्रयत्न केले होते. पण चीन, तुर्की आणि सौदीचा अपवाद वगळता दुसऱ्या कुठल्याही देशाने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. चीनने श्रीनगरमधील या बैठकीतून घेतलेली माघार म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भारताने स्वीकारलेल्या आक्रमक धोरणावर आलेली प्र्रतिक्रिया असल्याचे संकेत मिळत आहेत. तर तुर्की आणि सौदी यांना नाईलाजाने पाकिस्तानला प्रतिसाद द्यावा लागत असल्याचे दिसते. पण पुढच्या काळात हे दोन्ही देश पाकिस्तानला अशारितीने प्रतिसाद देऊन भारताला दुखवण्याची जोखीम पत्करणार नाहीत, असे पाकिस्तानचेच विश्लेषक सांगत आहेत.

जी२०च्या सदस्यदेशांपैकी स्पेन, सिंगापूर, मॉरिशस, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशांनी जम्मू व काश्मीरमधील पर्यटनावर भारताशी चर्चा केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.

leave a reply