जागतिक महागाईमुळे आफ्रिकेतील उपासमारीचे संकट तीव्र बनले आहे

‘आयएमएफ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशारा

Abebe Aemro Selassieजोहान्सबर्ग/लंडन – कोरोनाचे संकट येण्याआधी आफ्रिकेच्या सब सहारा क्षेत्रातील देशांमधल्या आठ कोटी जनसंख्येला पोटभर अन्न मिळत नव्हते. पण कोरोनाचा उद्रेक, युक्रेन संघर्षामुळे निर्माण झालेली इंधनटंचाई आणि अन्नधान्याचे संकट, यामुळे निर्माण झालेल्या जागतिक महागाईचा भीषण परिणाम सब सहारा आफ्रिकी देशांवर झाला आहे. येथील 12 कोटीहून अधिकजण उपासमारीच्या भयंकर संकटाचा सामना करीत आहेत, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला. कर्जात बुडालेल्या या आफ्रिकी देशांमधील ही परिस्थिती येत्या काळात अधिक तीव्र होईल, अशी चिंता या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

काही तासांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आफ्रिकेसाठीचा ‘रिजनल इकॉनॉमिक आऊटलूक’ अहवाल प्रसिद्ध केला. सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडे असलेल्या ‘सब सहारा’ देशांमधील परिस्थितीबाबत या अहवालात भीषण चिंता व्यक्त करण्यात आली. सध्या हे आफ्रिकी देश कोसळण्याच्या बेतात असल्याचे आयएमएफने आपल्या अहवालात म्हटले आहे. यासाठी आएमएफच्या आफ्रिका विभागाचे प्रमुख अबिबी सेलासी यांनी या आफ्रिकी देशांसमोरील उपासमारीच्या संकटाचा दाखला दिला.

sub sahara food insecurityआयएमएफकडून कर्ज घेतलेले आफ्रिकी देश कोरोनाचे संकट येण्याच्या आधीपासूनच अन्नटंचाईचा सामना करत होते. या देशांमधील जवळपास आठ कोटी जनतेला पुरेसे अन्न मिळत नव्हते. पण चार प्रमुख कारणांमुळे हेच सब सहारा आफ्रिकी देशांमधील उपासमारीचे संकट अधिकच भयंकर बनले आहे. कोरोनाचा उद्रेक व युक्रेनमधील संघर्ष, गेल्या चार वर्षांपासून ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ देशांमध्ये आलेला दुष्काळ, या क्षेत्रातील देशांमधील अस्थैर्य व असुरक्षितता आणि अंगोला-मदागास्कार देशांमधील पर्यावरणासंबंधी आपत्ती, यामुळे सब सहारा देशांमधील उपासमारीची समस्या भयावह बनल्याचे अबिबी यांनी लक्षात आणून दिले.

यामुळे सब सहारा देशांच्या एकूण जनसंख्येपैकी 12 टक्के अर्थात 12 कोटी 30 लाखांहून अधिकजण उपासमारीच्या संकटाला सामोरे जात असल्याचा इशारा अबिबी यांनी दिला. त्यामुळे कोरोनानंतर सदर आफ्रिकी देशांमधील उपासमारीने ग्रासलेल्यांच्या संख्येत 50 टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा अबिबी यांनी केला. सब सहारा आफ्रिकेतील इथिओपिया, सोमालिया, केनिया, डिआर काँगो, साऊथ सुदान या देशांमध्ये उपासमारीचे संकट तीव्र बनत चालल्याचे अबिबी यांनी लक्षात आणून दिले. यापैकी सोमालियावर दुर्भिक्ष्य कोसळणार असल्याचा इशारा अबिबी यांनी दिला.

2020 सालापासून जगभरातील इंधन आणि खतांचे दर तिपटीने वाढले असून आफ्रिकी देशांना याचे चटके बसत आहेत. त्यातच कोरोना, युक्रेनचा संघर्ष, इंधनटंचाईमुळे वाढलेल्या महागाईमुळे या आफ्रिकी देशांच्या सेंट्रल बँकांसमोर व्याजदर वाढविण्याचे मोठे आव्हान असल्याचेही अबिबी यांनी नमूद केले. नायजेरिया, घाना, इथिओपिया, मलावी आणि झिंबाब्वे या देशांना व्याजदरात मोठी वाढ करावी लागेले. असे केल्यास या देशांमध्ये महागाईचा प्रचंड भडका उडेल आणि उपासमारीचे संकट अधिकच तीव्र होईल, याकडे अबिबी यांनी लक्ष वेधले.

leave a reply