देशात सोन्याच्या दरांनी ५० हजारांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली – भारतात सोन्याच्या दर ५० हजारांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस १८०० डॉलर्सच्या पुढे पोहोचले होते. यामुळे भारतीय बाजारातही सोन्याच्या दराने उच्चांक नोंदविला आहे. जगभरात सध्या कोरोनाव्हायरसमुळे मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून गोल्ड एक्सचेंज ट्रेड फंड (ईटीएफ), गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणुकीला पसंती देत आहेत. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात प्रत्यक्ष मागणी नसतानाही सोन्याच्या किंमतीत उसळी दिसून येत असून दसऱ्यापर्यंत सोन्याचे दर ५५ हजारांच्या पुढे जातील, असा दावा ज्वेलर्स असोसिएशनकडून करण्यात आला आहे.

Gold-Ratesसोन्याचे दर घाऊक बाजारात प्रति १० ग्रॅम ४८ हजार ८८६ रुपयांपर्यंत पोहोचले असले, तरी किरकोळ बाजारात सोन्याच्या किंमती ५० हजारांच्या पुढे गेल्या आहेत. तसेच जीएसटी पकडून ग्राहकांना प्रति दहा ग्रॅमसाठी ५१ हजारांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. दिल्लीत किरकोळ बाजारात सोन्याचे दर ५०,०५० आणि मुंबईत प्रति तोळा सोन्याचे दर ५०,१२० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. देशात लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून सोन्याची प्रत्यक्ष मागणी ठप्प होती. मात्र या काळातही सोन्याच्या किंमती सतत वाढत राहिल्या. आता लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना प्रत्यक्ष सोन्याची मागणी सुरु झाल्यावर सोन्याच्या दरांमध्ये आणखी वाढ दिसून येत आहे.

सध्या कोरोनामुळे जगभरात बड्या अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली आहेत. शेअर बाजारातही मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीकडे गुंवणूकदारांचा कल वाढला आहे. त्यामध्ये कोरोनमुळेच जगभरात सोन्याच्या खाणीतून उत्पादनही कमी झाले आहे. याचा परिणामही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीवर दिसून येत आहे.

त्यामध्ये भारतात सोन्याची आयातही गेल्या तीन महिन्यात रोडावली आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात ७७ टनाहून अधिक सोने आयात झाले होते. यावर्षी जून महिन्यात केवळ ११ टन सोने आयात झाले आहे. त्यामध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यावर आता प्रत्यक्ष मागणी सुरु झाली आहे. दर वाढत असल्याने सोन्याच्या ऑनलाईन खरेदी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्वांचा परिणाम देशात सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या भीतीने आणि सोन्याच्या किंमती खाली येतील, अशी शक्यता बाळगून काही ग्राहक सोन्याची खरेदी टाळत आहेत. त्यामुळे आणखी तीन एक महिने प्रत्यक्ष मागणी कमी राहणार असली, तरी सोन्याचे दर चढेच राहणार असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दोन वर्षांंपूर्वी सोन्याचे दर ३० हजार ते ३२ हजार रुपये होते. गेल्या दोन वर्षांत परताव्याच्या बाबतीत सोन्यानेे इतर गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. गेेल्या एक वर्षात सोन्यानेे गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. सोन्याच्या दरात वाढ होत असताना चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे. चांदी प्रतिकिलो ५१ हजारावर गेली आहे.

leave a reply