डॉलरमधील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर पुन्हा दोन हजार डॉलर्सवर

Gold prices riseवॉशिंग्टन – अमेरिकी डॉलरमधील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सोन्याच्या दरांनी पुन्हा दोन हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या व्यवहारांमध्ये सोन्याचे दर प्रति औंस (२८.३३ ग्रॅम) २,००४ डॉलर्सवर गेल्याची नोंद झाली. तर अमेरिकेतील व्यवहारांमध्ये सोन्याच्या दरांनी २,०१८ डॉलर्स प्रति औंसापर्यंत उसळी घेतली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरांनी दोन हजार डॉलर्सची पातळी ओलांडल्यानंतर हे दर कायम राहतील, असे भाकित काही विश्लेषक व तज्ज्ञांनी वर्तविले होते. मंगळवारी दरांमध्ये झालेली वाढ त्याला दुजोरा देणारी ठरते.

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या व्यवहारांमध्ये सोन्याचे दरांनी उसळी घेत प्रति औंस २,०३० डॉलर्सचा टप्पा गाठला होता. अमेरिकी बाजारपेठेत सोन्याचा दर प्रति औंसामागे २,०३८ डॉलर्स असा नोंदविण्यात आला. त्यानंतरच्या २४ तासांमध्ये झालेल्या व्यवहारांमध्येही सोन्याचे दर दोन हजार डॉलर्सवर कायम राहिले होते. त्यामुळे सोन्याच्या बाजारपेठेशी निगडित विश्लेषक व तज्ज्ञांनी यावेळी सोने दोन हजारवरील स्तर कायम राखेल, असे संकेत दिले होते.

commodity-goldसोन्यातील या वाढीनंतर आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून जागतिक अर्थव्यवस्थेबाबत इशारे देणारे अहवाल प्रसिद्ध झाले होते. त्यात अर्थव्यवस्थेतील मंदीसदृश स्थिती पुढील काही वर्षे कायम राहिल, असे बजावण्यात आले होते. दुसऱ्या बाजूला अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीच्या मुद्यावर नक्की काय भूमिका घेईल याबाबत अनिश्चितता आहे. या अनिश्चिततेमुळे, मंगळवारी डॉलरच्या मूल्यात घसरण झाली. अमेरिकी डॉलरच्या मूल्यातील घसरण सोन्यासाठी महत्त्वाची ठरली व सोन्याच्या दरांनी उसळी घेतली, असा दावा विश्लेषकांनी केला आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरांनी दोन हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडणे ही २०२० सालापासूनची तिसरी वेळ ठरली होती. मात्र यापूर्वी झालेली वाढ ही तात्कालिक ठरली होती व सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा घसरण झाली होती. पण यावेळी तब्बल एक आठवड्यानंतरही सोन्याचे दर प्रति औंस दोन हजार डॉलर्सच्या वरचा स्तर कायम राखून आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून असलेले सोन्याचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

leave a reply