कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या निर्यातीला सरकारची मंजुरी

मुंबई – कोरोनावरील लसींचा पुरेसा साठा देशात असताना या लसींच्या निर्यातीला सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र किती लसी निर्यात करता येतील हे देशात लसींची आवश्यकता व उपलब्ध साठा किती याची चाचपणी करून दर महिन्याला ठरविण्यात येणार आहे.

गेल्याच महिन्यात सरकारने अतिरिक्त लसींची निर्यात करण्याची परवानगी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन बनविणार्‍या कंपन्यांना देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशात आतापर्यंत १२० कोटी लसी देण्यात आल्या आहेत. गुरुवारच्या एका दिवसात ९० लाख जणांना लस देण्यात आली. तसेच आतापर्यंत केंद्र सरकारने १३२ कोटी लसी केंद्र व राज्य सरकारांना पुरविल्या आहेत. राज्यांकडे सध्या २२.७२ कोटी लसी या वापराविना पडून आहेत. त्यामुळे सध्या लसीकरणासाठी पुरेशा लसी उपलब्ध आहेत. त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडे लसींच्या निर्यातीसंदर्भात आलेल्या काही प्रस्तावांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

सिरमकडे नेपाळ, ताजिकिस्तान, बांगलादेश आणि मोझंबिकमधून लसींची मागणी करण्यात आली होती. यानुसार ५० लाख कोविशिल्ड लसी निर्यात करण्याची परवानगी सिरमला देण्यात आली आहे. याच आठवड्यात नेपाळ आणि तजिकिस्तानला लसी रवाना होतील. सिरमकडे सध्या २४ कोटी ८९ लाख १५ हजार लसींचा साठा आहे आणि दरदिवशी त्यामध्ये भर पडत आहे. याबाबत सिरमने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला कळविले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

मात्र दरमहिन्याला किती लसी सिरम किंवा भारत बायोटेक निर्यात करू शकेल, याचा निर्णय दर महिन्याला साठा तपासून आणि देशांतर्गत मागणी पाहून घेतला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. डिसेंबर महिन्यात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन, सिरमच्या कोविशिल्ड आणि झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी या लसींच्या ३१ कोटी मात्रा सरकारला उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे.

leave a reply