तालिबानला पाकिस्तानच्या सरकारचा पाठिंबा

- पाकिस्तानच्या पश्तू नेत्याचा गंभीर आरोप

पाकिस्तानच्या सरकारइस्लामाबाद – अफगाण तालिबानबरोबरच्या संबंधावरुन परस्परविरोधी विधाने करणार्‍या पाकिस्तानचा पाकिस्तानी नेते आणि जनताच पर्दाफाश करीत आहेत. ‘बलोचिस्तानच्या क्वेट्टासह पाकिस्तानच्या इतर शहरांमध्ये तालिबानचे दहशतवादी बिनधास्तपणे वावरत आहेत. पाकिस्तानी यंत्रणेच्या सहमतीशिवाय हे शक्यच नाही’, असा आरोप पाकिस्तानातील पश्तूंचे मोठे नेते मोहसिन दावर यांनी केला. पाकिस्तान अफगाणिस्तानात दहशतवादी ‘एक्स्पोर्ट’ करीत असल्याची कबुली पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर नेते देत असल्याचा दावा दावर यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता.

अफगाणिस्तानात तालिबानला मिळालेल्या यशामागे पाकिस्तान असल्याचा आरोप अमेरिकन नेते व लष्करी अधिकारी करीत आहेत. त्याचवेळी तालिबानच्या कट्टर राजवटीपासून पाकिस्तानला सर्वाधिक धोका संभवतो, असे मानणारे पाकिस्तानच्या सरकारपाकिस्तानातील बुद्धिमंत, विश्‍लेषक व पत्रकार देखील यावर चिंता व्यक्त करीत आहेत. तालिबानकडे अफगाणिस्तानचा ताबा यावा, यासाठी पाकिस्तानचे लष्कर आणि सरकार करीत असलेली धडपड ही चिंताजनक बाब ठरते, आज ना उद्या हे पाकिस्तानवरच उलटल्यावाचून राहणार नाही, असा इशारा बुद्धिमंत, विश्‍लेषक व पत्रकार देत आहेत. आता राजकीय नेते देखील पाकिस्तानच्या लष्कर व सरकारला यावरून लक्ष्य करू लागले आहेत.

पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वा प्रांताचे नेते मोहसिन दावर यांनी जर्मन वृत्तसंस्थेशी बोलताना, अफगाण तालिबानला पाकिस्तानी यंत्रणेचा पाठिंबा असल्याचे सांगितले. ‘तालिबानचे दहशतवादी उघडपणे पाकिस्तानात त्यांच्या सभा घेतात. त्यांना स्थानिकांचे समर्थन आहे. याआधी पाकिस्तानातील प्रार्थनास्थळांमधून तालिबान समर्थक धार्मिक नेते दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करायचे. पण आता ते प्रत्येकाच्या दारावर जाऊन हा निधी गोळा करू लागले आहेत. पाकिस्तान सरकारच्या सहमतीशिवाय हे शक्यच नाही’, असे दावर यांनी ठासून सांगितले.

पाकिस्तानच्या सरकारपाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेचे कडवे विरोधक असलेले मोहसिन दावर यांनी याआधीही पाकिस्तानची यंत्रणा आणि अफगाण तालिबानमध्ये सहकार्य असल्याचे आरोप केले होते. ‘पाकिस्तान अफगाणिस्तानात तालिबानचे दहशतवादी निर्यात करतो. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वी आणि परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी तालिबानबाबत केलेली विधान याची कबुली देतात’, असा आरोप दावर यांनूी दोन आठवड्यांपूर्वी केला होता. अफगाणिस्तानातील संघर्षात ठार होणार्‍या तालिबानी दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानात आणले जात असल्याचेही दावर यांनी सोशल मीडियातील आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

फक्त मोहसिन दावरच नाही तर पाकिस्तानची जनता देखील आपल्या सरकारचा तालिबानला पाठिंबा असल्याचा आरोप करू लागले आहेत. बलोचिस्तानची राजधानी क्वेट्टा शहर आणि पिशिन जिल्ह्यात अफगाण तालिबानचे दहशतवादी बिनधास्तपणे वावरत असल्याची माहिती काही स्थानिकांनी जर्मन वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. इतकेच नाही तर पाकिस्तानातील रुग्णालयातही तालिबानी दहशतवाद्यांवर उपचार सुरू असल्याचे पाकिस्तानी जनता ओरडून सांगत आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरातून पाकिस्तान व दहशतवादी संघटनांमधील सहकार्यावर आरोप झाले होते. पण आत्ता पाकिस्तानचे नेते व येथील जनताच उघडपणे याबाबत बोलू लागले आहेत.

leave a reply