इस्रोच्या ‘एनएसआयएल’कडून ‘जीसॅट-24′ उपग्रहाचे प्रक्षेपण

- अंतराळ क्षेत्रातील सुधारणानंतर पहिले ‘डिमांड ड्राइव्ह' मिशन

बंगळुरू – इस्रोची व्यावसायिक कंपनी असलेल्या ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’ने (एनएसआयएल) मागणीवर आधारीत आपली पहिली मोहिम यशस्वी केली आहे. टाटा प्लेच्या डिटूएच सेवेसाठी विशेष ‘जीसॅट-24′ हा दूरसंचार उपग्रह दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गुआना येथून प्रक्षेपित करण्यात आला. यासाठी फ्रेंच कंपनी एरियनस्पेसच्या प्रक्षेपकाचे सहाय्य घेण्यात आले. ‘जीसॅट-24’च्या प्रक्षेपणाने इस्रोच्या ‘एनएसआयएल’ने व्यावसायिक प्रक्षेपण क्षेत्रात दमदार पाऊल ठेवले आहे.

‘एनएसआयएल’ने अवकाशात प्रक्षेपित केलेला जीसॅट-24 हा उपग्रह 24-क्यूबॅण्ड दूरसंचार उपग्रह आहे. या उपग्रहाचे वजन 4 हजार 180 किलो असून संपूर्ण भारतात डिटूएच सेवेसाठी आवश्यक नेटवर्क पुरविण्याची क्षमता या उपग्रहात आहे. टाटा प्ले ही कंपनी या उपग्रहाच्या पूर्ण क्षमतेचा वापर करणार आहे. टाटा प्लेला या उपग्रहाची क्षमता भाड्याने देण्यात आली आहे. टाटा ग्रुपच्या या कंपनीने यासाठी एनएसआयएलशी करार केला आहे. यामुळे टाटा प्लेला संपूर्ण भारतात उच्च दर्जाच्या दूरसंचार सेवा व प्रसारण करता येणार आहेत. मात्र या उपग्रहाचे स्वामित्व, संचलन व देखभाल करण्याची पूर्ण जबाबदारी ही एनएसआयएलची असणार आहे. ‘जीसॅट-24’चे आयुष्य पंधरा वर्षाचे असेल.

‘एनएसआयएल’ची स्थापना 2019 साली करण्यात आली होती. याचवर्षी सरकारने अंतराळ क्षेत्रासंबंधी आपले नवे धोरण जाहीर केले होते. अंतराळ सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत खाजगी कंपन्यांनाही यामध्ये उतरण्यास परवानगी देण्यात आली होती. त्याचवेळी ‘एनएसआयएल’ ही आपली व्यावसायिक कंपनीही सरकारने स्थापन केली. आवश्यकता व मागणीनुसार उपग्रहाची निर्मिती करणे, हे उपग्रह अवकाशात सोडून त्याचे संचलन करणे, उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी विविध क्षमतेचे रॉकेट प्रक्षेपक विकसित करणे हे काम ‘एनएसआयएल’कडे सोपविण्यात आले.

व्यावसायिक वापरासाठीचे दूरसंचार उपग्रह तसेच वातावरण, जलसंपदा, वनसंपदा यावर लक्ष ठेवणाऱ्या उपग्रहांना ‘एनएसआयएल’ अवकाशात सोडणार आहे. तसेच या उपग्रहांच्या मदतीने आपल्या ग्राहकांना सेवा पुरविण्याचे काम इस्रोच्या या व्यावसायिक कंपनीचे असेल. यालाच ‘डिमांड ड्राइव्ह’ मॉड्यूल असे म्हटले जात आहे. मागणीनुसार आवश्यक उपग्रह अवकाशात सोडून ग्राहक कंपन्यांना त्याच्याक्षमता यानुसार भाड्याने वापरण्यास देण्यात येणार आहेत. याच ‘डिमांड ड्राइव्ह’ मॉड्यूलनुसार ‘एनएसआयएल’ने आपला पहिला उपग्रह अवकाशात सोडला आहे. याद्वारे कंपनीने व्यावसायिक उपग्रह क्षेत्रात दमदार पाऊल ठेवले आहे.

सध्या ‘एनएसआयएल’ ब्रॉडबॅण्ड सेवा पुरविणाऱ्या दोन कंपन्यांच्या दोन प्रोजेक्टवर काम करीत असल्याची माहिती समोर येत आहे. ‘जीसॅट-24′ उपग्रहासह ‘एनएसआयएल’ फ्रेंच गुआनामधून एका मलेशियन उपग्रहाचेही अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले. ‘एनएसआयएल’मध्ये सरकार दहा हजार कोटीची गुंतवणूक करणार आहे. तसेच बाजारातून ‘एनएसआयएल’ सुमारे दोन हजार कोटी रुपये उभे करेल. इस्रोने अवकाशात सोडलेल्या 10 इनऑर्बिट उपग्रहांना ‘एनएसआयएल’कडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने यासाठी मंजुरी दिली होती. यामुळे भारतीय अंतराळ क्षेत्रात ही कंपनी भविष्यात मोठे व्यावसायिक यश मिळविल अशी शक्यता व्यक्त केली जाते.

अमेरिकेच्या एलन मस्क यांच्या स्पेस एक्सप्रमाणे येत्या चार-पाच वर्षात अंतराळ क्षेत्रातील मोठी कंपनी भारतात उभी राहिल असे काही दिवसांपूर्वीच इस्रोच्या अधिकाऱ्याने म्हटले होते. ‘एनएसआयएल’ ही सरकारी अंतराळ कंपनी भारताला असेच यश व किर्ती मिळवून देईल, असा दावा तज्ज्ञ करीत आहेत.

leave a reply