जीएसटी महसूल एक लाख 20 हजार कोटींवर; सलग चौथ्या महिन्यात जीएसटी महसूल एक लाख कोटींच्या पुढे

नवी दिल्ली – जानेवारी महिन्यात ‘जीएसटी’ महसूल विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. जीएसटी महसूल सुमारे 1 लाख 20 हजार कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत यामध्ये तब्बल साडे चार हजार कोटी रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. तसेच सलग चौथ्या महिन्यात जीएसटी महसूल 1 लाख कोटी रुपयांहून अधिक राहिला असून भारताची अर्थव्यवस्था कोरोना संकटाला बाजूला सारून वेगाने पूर्ववत होत असल्याचे हे स्पष्ट संकेत असल्याचे विश्‍लेकांचे म्हणणे आहे.

Advertisement

डिसेंबर महिन्यात 1 लाख 15 हजार 174 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल सरकारला मिळाला होता. 2017 साली जीएसटी देशभरात लागू झाल्यापासून कोणत्याही एका महिन्यात इतका जीएसटी मिळण्याचा हा विक्रम होता. याआधी 2019 च्या डिसेंबर महिन्यात 1 लाख 13 हजार 866 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल सरकारला मिळाला होता. मात्र जानेवारी 2021 सालात जीएसटी महसूलाने हे सारे विक्रम मोडले आहेत.

जानेवारी महिन्यात तब्बल 1 लाख 19 हजार 847 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल गोळा झाला आहे. या आधीच्या महिन्याच्या तुलनेत हा महसूल 4 हजार 673 कोटी रुपयाहून जास्त आहे. तसेच गेल्यावर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत हा जीएसटी 8.14 टक्क्यांनी अधिक आहे. 2020च्या जानेवारी महिन्यात 1 लाख 10 हजार 818 इतका जीएसटी महसूल सरकारला मिळाला होता. कोरोना संकटामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्या सहा महिन्यात जीएसटी महसूलात तब्बल 24 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली होती.

जानेवारी महिन्यात जमा झालेल्या जीएसटी महसूलात राज्यांचा वाटा अर्थात एसजीएसटी 29 हजार 14 कोटी रुपये, केंद्रीय जीएसटी अर्थात सीजीएसटी 21 हजार 923 कोटी रुपये आहे. याशिवाय इंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) 60 हजार 288 कोटी रुपयांचा असून यामध्ये 27 हजार 424 कोटी रुपये आयात मालावरील करातून, तर 8 हजार 622 कोटी रुपये उपकरातून (सेस) मिळाले आहेत. याशिवाय 31 जानेवारीपर्यंत 90 लाख जीएसटी रिटर्न भरण्यात आले आहेत, अशी माहितीही सरकारच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान देशात जीएसटी महसूलात होणारी वाढ कोरानाकाळात विस्कटलेले देशाचे अर्थचक्र पुन्हा व्यवस्थित होत असल्याचे निदर्शक ठरते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या चार महिन्यांपासून जीएसटी महसूल 1 लाख कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त नोंदविला जात आहे. यातून आर्थिक व्यवहार जोरदारपणे सुरू असून उत्पादन आणि सेवा क्षेत्रात मोठी उलाढाल सुरू असल्याचे लक्षात येते, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वाढलेल्या जीएसटी महसूलाचा दाखला दिला.

leave a reply