जानेवारी महिन्यात जीएसटी महसूल १.४१ लाख कोटी रुपयांवर

नवी दिल्ली – जानेवारी महिन्यात ‘जीएसटी’ महसूलात २४ टक्क्यांची वाढ झाली असून १.४१ लाख कोटी रुपयांचा महसूल गोळा झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. जीएसटी लागू झाल्यापासून कोणत्याही एका महिन्यात मिळालेला हा सर्वाधिक जीएसटी महसूल आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात एक लाख ३९ हजार ७०८ कोटी इतका जीएसटी महसूल मिळाला होता. हा आतापर्यंतचा विक्रम होता.

जानेवारी महिन्यात जीएसटी महसूल १.४१ लाख कोटी रुपयांवरजानेवारी महिन्यात सरकारला एकूण एक लाख ४० हजार ९८६ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केले. त्याच्या एक दिवस आधीच १ जानेवारी ते ३१ जानेवारीच्या दुपारी तीन वाजेपर्यंत एक लाख ३८ हजार ३९४ कोटी रुपयांचा जीएसटी महसूल महिनाभरात मिळाल्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र या महसूल आकड्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुधारणा केली. कोरोनाच्या संकटातही जीएसटी महसूल वाढला असून याबाद्दल करदात्यांचे सीतारामन यांनी आभार मानले. तसेच जीएसटी महसूली यंत्रणेबाबत अद्याप काही आव्हाने आहेत, याची कबूलीही अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली.

जानेवारी महिन्यात मिळालेला १.४१ लाख कोटी रुपयांचा जीएसटी महसूल गेल्यावर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत २४ टक्क्यांनी जास्त आहे. तर २०२० च्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत ३५ टक्क्यांची वाढ यामध्ये नोंदविण्यात आली आहे. तर गेल्या महिन्यात १.२९ लाख कोटी रुपयांचा जीएसटी महसूल सरकारला मिळाला होता.

१.४१ लाख कोटी जीएसटी महसूलामध्ये २४ हजार ६७४ कोटी रुपये इतका केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) असून राज्यांचा जीएसटी (एसजीएसटी) ३२ हजार १६ कोटी रुपये इतका असल्याची माहिती सरकारने दिली आहे. याशिवाय आयजीएसटी ७२ हजार ३० कोटी रुपये असून यामध्ये आयात मालावरील ३५ हजार १८१ कोटी रुपये इतक्या जीएसटीचा समावेश आहे. याशिवाय ९ हजार ६७४ इतका उपकर सरकारला मिळाला आहे.

जीएसटीमध्ये वाढ झाल्याने आर्थिक तूट कमी होण्यास मदत मिळेल. कोरोनाचे संकट दूर सारत अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे हे संकेत असल्याचे मत विश्‍लेषकांकडून व्यक्त केले जाते.

leave a reply