वेस्ट बँकमधील गोळीबारानंतर हमासचे इस्रायलवर रॉकेट हल्ले

- इस्रायलकडून हवाई कारवाईद्वारे प्रत्युत्तर

नेब्लस/जेरूसलेम – पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमध्ये दडलेल्या वाँटेड दहशतवाद्यांवर इस्रायली लष्कराने केलेल्या कारवाईत 11 जण ठार झाले. इस्रायलच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या दहशतवाद्यांवर ही कारवाई केल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. पण याचे पडसाद गाझापट्टीत उमटले असून हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविले. प्रत्युत्तरादाखल इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझातील हमासचा शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि शस्त्रास्त्रांचे कोठार नष्टे केले. वेस्ट बँकमधील इस्रायलच्या कारवाईनंतर गाझापट्टीतून रॉकेट हल्ले सुरू झाल्याची दीड महिन्यातील ही तिसरी घटना ठरते.

काही दिवसांपूर्वी वेस्ट बँकमध्ये ज्यूधर्मिय व इस्रायलच्या सुरक्षा जवानांवर गोळीबार झाला होता. तेव्हापासून इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणा हल्लेखोरांच्या शोधात होत्या. हे हल्लेखोर वेस्ट बँकच्या नेब्लस शहरातील इमारतीत दडून असल्याची माहिती मिळाल्यानंतर इस्रायलच्या लष्कराने सदर इमारतीला घेराव टाकला. यावेळी दहशतवाद्यांबरोबर त्यांचे समर्थक देखील होते. यानंतर इस्रायली लष्कर व दहशतवाद्यांमध्ये पेटलेल्या संघर्षात 11 जण ठार झाले तर 100 हून अधिक जखमी झाले. यामध्ये दहशतवाद्यांमध्ये हमासच्या दहशतवाद्याचा देखील समावेश होता, अशी माहिती समोर आली आहे.

इस्रायलने पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमध्ये केलेल्या या कारवाईवर इराणने टीका केली. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलविरोधात कठोर भूमिका स्वीकारावी, असे आवाहन इराणने केले. तर गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या अश्केलॉन व स्देरॉत शहरावर पाच रॉकेट्स डागले. इस्रायलने गाझाच्या सीमेजवळ तैनात केलेल्या आयर्न डोम यंत्रणेने हमासचे हे रॉकेट हल्ले उधळले. यातील एक रॉकेट निर्जन स्थळी कोसळले. यानंतर गुरुवारी सकाळी इस्रायलच्या हवाईदलाने गाझात हल्ले चढविले. इस्रायलच्या लढाऊ विमानांची कारवाई हमासचा शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना आणि कोठाराला लक्ष्य करणारी होती.

गेल्या काही वर्षांपासून पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास व त्यांच्या फताह पक्षाची वेस्ट बँकवरील पकड ढिली पडू लागली आहे. त्यामुळे गाझापट्टीप्रमाणे वेस्ट बँकमध्येही हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांचा प्रभाव वाढत चालला आहे. परिणामस्वरुप वेस्ट बँकमधून ज्यूधर्मिय तसेच इस्रायली सुरक्षा जवानांवरील हल्ले वाढले आहेत. गेल्या वर्षापर्यंत हमास व इस्लामिक जिहादच्या प्रभावाखाली असलेले कट्टरपंथीय या हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले होते. पण गेल्या काही आठवड्यांपासून हमास व इस्लामिक जिहादचे दहशतवादीच हल्ले करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वेस्ट बँकमधील ही परिस्थिती इस्रायलमधील गृहयुद्धाला आमंत्रण देणारी ठरू शकते, असा इशारा अमेरिका तसेच पाश्चिमात्य विश्लेषक देत आहेत.

leave a reply