अतिवृष्टी व पुरामुळे देशभरात ८६८ जणांचा बळी

- केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली – देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेली अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे ८६८ जणांचा बळी गेल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. मंत्रालयाच्या ‘आपत्ती व्यवस्थापन विभागा’ने प्रसिद्ध केलेल्या ‘फ्लड सिच्युएशन रिपोर्ट’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणाच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून या राज्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

अतिवृष्टी

अपवादात्मक अतिवृष्टीसह हवामानातील बदलांमुळे यावर्षी अनेक भागात दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याचे निदर्शनास आले. राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील एका गावात केवळ सहा तासांत २५ सेमी पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासात ओडिशा, छत्तीसगड, राजस्थानमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. तर पुढील २४ तासांमध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा ‘नॅशनल वेदर फोरकास्टिंग सेंटर’कडून देण्यात आला आहे.

यावर्षी झालेली अतिवृष्टी व पुरामुळे केरळमध्ये सर्वाधिक २४७ बळी गेले आहेत. उत्तर प्रदेशात १९१, पश्चिम बंगालमध्ये १८३, महाराष्ट्रात १३९, गुजरातमध्ये ५२, आसामात ४५, तर नागालँडमध्ये ११ जणांचा बळी गेला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. ११ ते १४ ऑगस्टमध्ये देशाच्या सर्व भागात पाऊस पडला असून वायव्य व मध्य भारतात तुफान पाऊस पडला आहे. या पावसामुळे जुलै महिन्यात झालेल्या सरासरी पावसाची कमतरता या दिवसात भरून निघाल्याचे अहवालात सांगण्यात आले.

अतिवृष्टी

सध्या नैऋत्य मौसमी वारे सक्रीय झाल्यामुळे महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागात पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. या पावसामुळे बहुतेक धरणांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. विशेषत: कृष्णा, भीमा, गोदावरी, कोयना नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक वाढ झाली आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातल्या सर्व ८७३ जलप्रकल्पांत ५१ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

पुणे परिसराच्या धरण परिसरात ८३.८६% पाणीसाठा झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. कृष्णा खोऱ्यातील धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयना, वारणा, कासारी, तुळशी, राधानगरी, दूधगंगा, पाटगाव ही धरणेही ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. कोयना धरण परिसरात पाऊस सुरू असून कोयना धरणाचे सहा दरवाजे १० इंच उचलण्यात आले आहेत. त्यामुळे कोयना नदीत ५४ हजार २४६ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीला पूर आला असून पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरले आहे. यामुळे परिसरातील १०० गावांचा संपर्क तुटला आहे. इथली अनेक घरे व दुकाने पाण्याखाली गेली आहेत.

उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये शरयू नदीला पूर आल्याने परिस्थिती बिकट बनली आहे. या पुरामुळे ५५ हजारांहून अधिक जणांना याचा फटका बसला आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद तसेच ग्रामीण भागात पाऊस सुरू आहे. यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

leave a reply