इस्रायलवरील हल्ल्याचे हिजबुल्लाहला गंभीर परिणाम भोगावे लागतील

- इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ

गंभीर परिणामजेरूसलेम – ‘हिजबुल्लाहचे दहशतवादी लेबेनॉनच्या दक्षिण सीमेवर इस्रायलविरोधी हालचाली करीत आहेत. हिजबुल्लाहच्या या हालचालींवर इस्रायल करडी नजर रोखलेली आहे. हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला केलाच, तर त्यासाठी या दहशतवादी संघटनेला त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. हिजबुल्लाह इस्रायलच्या विरोधात काही तरी नवीन घडविण्याच्या तयारीत असल्याचे संरक्षणमंत्री गांत्झ म्हणाले.

इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी नुकताच उत्तरेकडील सीमेचा दौरा केला. यावेळी संरक्षणमंत्री गांत्झ यांनी इस्रायलच्या लष्करी चौक्यांना भेट देऊन सीमेवरील सुरक्षेची पाहणी केली. तसेच हिजबुल्लाहने खोदलेल्या आणि इस्रायली लष्कराच्या ताब्यात असलेल्या भुयारांची पाहणी केली. लेबेनॉनच्या सीमेवरुन मिळणार्‍या आव्हानांना उत्तर देण्यासाठी इस्रायलचे लष्कर सज्ज असल्याची घोषणा संरक्षणमंत्री गांत्झ यांनी केली.

‘नवीन डावपेचांचा वापर करून हिजबुल्लाह इस्रायलला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहे. पण हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ले चढविण्याचा प्रयत्न केलाच तर याचे अतिशय भीषण परिणाम हिजबुल्लाहला भोगावे लागतील. तेव्हा इस्रायलला आव्हान देण्याची चूक हिजबुल्लाह करणार नाही, अशी अपेक्षा आहे’, असे गांत्झ यांनी बजावले.

त्याचबरोबर इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणलाही इशारा दिला. ‘इराण हिजबुल्लाह आणि इतर दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने व अण्वस्त्रनिर्मितीच्या प्रयत्नांनी या क्षेत्रात अस्थैर्य निर्माण करीत आहे. पण इस्रायल इराणला अण्वस्त्रनिर्मिती करू देणार नाही. अमेरिका आणि या क्षेत्रातील आपल्या सहकारी देशांच्या सहाय्याने इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी यापुढेही प्रयत्न करीत राहिल’, अशी घोषणा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केली.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून लेबेनॉनच्या दक्षिण सीमेवरील हिजबुल्लाहच्या हालचाली वाढल्या आहेत. या भागात हिजबुल्लाहने मोठ्या प्रमाणात रॉकेट्स व क्षेपणास्त्रे तैनात केली असून क्षेपणास्त्रांचे कारखाने टाकल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. गेल्याच महिन्यात इस्रायलने युरोपिय देशांच्या राजनैतिक अधिकार्‍यांना लेबेनॉनच्या सीमेजवळ नेले होते. या भागात हिजबुल्लाहने खोदलेल्या भुयारांची माहिती देऊन इराणसंलग्न दहशतवादी संघटना इस्रायलवर हल्ले चढविण्याच्या तयारीत असल्याचे पुरावे इस्रायली लष्कराने यावेळी या राजनैतिक अधिकार्‍यांना दिले होते.

leave a reply