सोन्याच्या दरांची प्रति औंस दोन हजार डॉलर्सवर ऐतिहासिक झेप

न्यूयॉर्क/लंडन – कोरोनाची साथ, जगातील मध्यवर्ती बँकांनी जाहीर केलेले प्रचंड अर्थसहाय्य आणि अमेरिका व चीनमधील वाढता तणाव, या पार्श्वभूमीवर मंगळवारी सोन्याच्या दरांनी विक्रमी उसळी घेतली. अमेरिकेतील बाजारपेठेत मंगळवारी झालेल्या व्यवहारांमध्ये सोन्याच्या दराने १.७ टक्क्यांनी उसळी घेत प्रति औंस (२८.३४ ग्रॅम्स) २,०२१ डॉलर्सपर्यंत ऐतिहासिक झेप घेतली. सोन्याच्या दराने प्रति औंस दोन हजार डॉलर्सवर झेप घेण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. सोन्याच्या दरांमधील ही वाढ बुधवारीही कायम राहिली असून सकाळी झालेल्या व्यवहारांमध्ये प्रति औंस २,०५४ डॉलर्ससह नवा उच्चांक नोंदविण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी भारतातील सोन्याच्या दरांनीही तोळ्यामागे (१० ग्रॅम-२४ कॅरेट) ५६,७५० रुपयांपर्यंत झेप घेतली आहे.

Gold-rateगेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोनाव्हायरस साथीचा फैलाव पुन्हा एकदा तीव्र रूप धारण करीत असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेसह युरोप, आशिया व आफ्रिका खंडांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत प्रचंड घसरण झाली असून नव्या आर्थिक मंदीला सुरुवात झाल्याचे दावे तज्ञांकडून करण्यात येत आहे. मंदीतून सावरण्यासाठी अमेरिकेसह युरोपिय व आशियाई देशांच्या मध्यवर्ती बॅंकांनी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्याची घोषणा केली असून व्याजदरही शून्यानजिक आणून ठेवले आहेत. त्याचवेळी अमेरिका व चीनमधील वाढता तणाव आणि आखातात तीव्र होत चाललेला संघर्ष यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनिश्चितता व अस्थैर्याचे वातावरण आहे.

या पार्श्‍वभूमीवर, गुंतवणूकदारांनी सुरक्षित व शाश्वत पर्याय म्हणून पुन्हा एकदा सोन्याकडे मोहरा वळविल्याचे दिसत आहे. २०१९ साली सोन्याच्या दरांनी वर्षभरात तब्बल २५ टक्‍क्‍यांची वाढ नोंदविली होती. यावर्षी पहिल्या सात महिन्यांमध्येच सोन्याच्या दरामध्ये ३० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली असून यापुढेही हा कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. मंगळवारी झालेल्या व्यवहारांमध्ये सोन्याच्या दरांनी १.७ टक्क्यांची उसळी घेऊन प्रति औंसामागे ३४ डॉलर्सहून अधिक वाढ नोंदविली. त्यामुळे सोन्याच्या दरांनी दोन हजार डॉलर्सची पातळी ओलांडून थेट २,०२१ डॉलर्सपर्यंत झेप घेतली.

Gold-rate-highमंगळवारच्या या उसळीचा प्रभाव बुधवारी सुरु झालेल्या व्यवहारांमध्येही कायम राहिल्याचे दिसून आले. बुधवारी बाजारपेठ उघडल्यानंतर सुरू झालेल्या व्यवहारांमध्येही सोन्याच्या दरांनी प्रति औंस २,०५० डॉलर्सचा नवा उच्चांक गाठला. याच पार्श्वभूमीवर, ‘बँक ऑफ अमेरिका ग्लोबल रिसर्च’च्या विश्लेषकांनी २०२१ सालच्या अखेरपर्यंत सोन्याचे दर प्रति औंस तीन हजार डॉलर्सपर्यंत जातील, असे भाकित वर्तविले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतातील सोन्याच्या दरांनीही नवा उच्चांक गाठला आहे. बुधवारी भारतातील सोन्याचे दर तोळ्यामागे ५६,७५० रुपयांवर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

leave a reply