येमेनमध्ये हौथींच्या हल्ल्यात 17 जण ठार

रियाध – हौथी बंडखोरांनी येमेनच्याच मारिब शहरात चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 जणांचा बळी गेला. यामध्ये पाच वर्षाच्या मुलीचा समावेश असल्याची बाब समोर आल्यानंतर हौथींवर टीका सुरू झाली आहे. येमेनमधील हादी सरकार आणि हौथी बंडखोरांमध्ये संघर्षबंदी घडविण्यासाठी ओमानचे विशेष शिष्टमंडळ राजधानी सनामध्ये दाखल झाले आहे. अशावेळी हौथींनी हा हल्ला चढवून आंतरराष्ट्रीय रोषाला ओढावून घेतल्याचे दिसत आहे.

येमेनमध्ये हौथींच्या हल्ल्यात 17 जण ठारमारिब हा येमेनमधील इंधनाने समृद्ध असलेला भाग म्हणून प्रसिद्ध आहे. इथले नियंत्रण आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेले येमेनमधील हादी सरकारकडे आहे. पण येमेनवरील हादी सरकारचे नियंत्रण न जुमानणार्‍या आणि राजधानी सनाचा ताबा घेऊन समांतर सरकार चालविणार्‍या हौथी बंडखोरांनी मारिबचा ताबा मिळविण्यासाठी हल्ले सुरू केले आहेत. रविवारी मारिबमधील रावधा गॅस स्टेशनजवळ हौथींनी क्षेपणास्त्र हल्ला केला.

या स्फोटात 17 जणांचा बळी गेल्याचा आरोप हादी सरकार करीत आहे. हौथी बंडखोर सत्तेच्या हव्यासापोटी निरपराध नागरिकांना लक्ष्य करीत असल्याचा ठपका हादी सरकारने ठेवला. मारिबवरील या हल्ल्यावर आखाती तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमातूनही टीका होत आहे. 2014 सालापासून येमेनमध्ये भडकलेल्या गृहयुद्धामुळे विस्थापित झालेल्या हजारोजणांनी मारिबमधील शरणार्थी शिबिरात आश्रय घेतला आहे. हौथींच्या या हल्ल्यांमुळे इथल्या शरणार्थींची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे ताशेरे आंतरराष्ट्रीय स्तरातून ओढले जात आहेत.

leave a reply