आसाममधील ‘ऑईल इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या तेल विहीरीला भीषण आग

गुवाहाटी – आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील बागजान गावात ‘ऑईल इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या तेल विहीरीला लागलेल्या आगीत दोन अग्निशामक जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. मंगळवारी संध्याकाळी या तेल विहीरीला भीषण आग लागली. ही आग आजूबाजूच्या गावांमध्ये पोहोचली असून गावातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. दरम्यान आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे.

Aasam Oil India LTD२७ मे रोजी या तेल विहीरीला स्फोट झाला होता त्यानंतर या तेल विहीरीतून वायू गळती सुरू होती. यामुळे इथल्या जैवविविधतेचे नुकसान झाले आहे. मंगळवारी संध्याकाळी अचानक या विहीरीला आग लागली. आगीच्या ज्वाला दीड किलोमीटर परिसरापर्यंत दिसत होत्या. आग लागल्यानंतर ऑईल इंडिया आणि ओनजीसीच्या कर्मचार्‍यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले. पण आग विझवित असताना दोन जवान बेपत्ता झाले. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घ्यावी लागली.

बुधवारी सकाळी बाजूच्या विहिरीत या जवानांचे मृतदेह सापडला. वाढती आग पाहून आसाम सरकारने भारतीय नौदल आणि लष्कराची मदत घेतली आहे.

या आगीच्या ज्वाला आजूबाजूच्या गावापर्यंत पोहोचल्या असून सहा जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या भागातील सहा हजारांहून अधिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. या तेल विहीरीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सिंगापूरहून तज्ज्ञांना बोलावण्यात आले आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चार आठवड्यांहून अधिक कालावधी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या घटनेनंतर आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन इथल्या रहिवाशांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री सोनोवाल यांनी या घटनेची माहिती पंतप्रधान मोदी व केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिली आहे. पंतप्रधानांनी या प्रकरणात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांना दिले आहे.

leave a reply