सुरक्षादलांमधील भरतीला जम्मू-काश्मीरच्या तरुणांचा प्रचंड प्रतिसाद

श्रीनगर – ‘सीमा सुरक्षा दल'(बीएसएफ) आणि ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बला’मध्ये (सीआयएसएफ) भरतीसाठी जम्मू-काश्मीरमधील तब्बल ३०,००० उमेदवार लेखी परिक्षेत सहभागी झाले. काश्मीरमधून मोठ्या प्रमाणावर तरुण आता भारतीय सुरक्षादलांमध्ये सामील होऊ लागले आहेत. गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमधून कलम-३७० हटविल्यानंतर येथील तरुणांचा सुरक्षा दलांमध्ये भरती होण्यासाठी मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे.

jammu-and-kashmir

जम्मू आणि काश्मीरच्या २० आणि लडाखमधल्या दोन जिल्ह्यातील उमेदवारांसाठी लष्कराच्या विविध केंद्रावर ‘बीएसएफ’ आणि ‘सीआयएसएफ’ची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे नियम पाळून या परीक्षा पार पडल्या. ‘बीएसएफ’ आणि ‘सीआयएसएफ’ने पुरुष व महिला कॉन्स्टेबल्स पदासाठी जम्मू-काश्मीर आणि लडाखमधून ३४,००० उमेदवार पात्र ठरविले होते. हे उमेदवार शारीरिक चाचणीत देखील पास झाले होते. यातील ३०,००० उमेदवार लेखी परिक्षेत सहभागी झाली होते. तरुणांचा हा उत्साह थक्क करुन सोडणारा होता.

दरम्यान, यंदाच्या वर्षी काश्मीरचे १३७ युवक ‘लश्कर-ए-तोयबा’ आणि ‘हिजबुल-मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनांमध्ये भरती झाले आहेत. पण लष्कराच्या धडक कारवाईत यातील ६२ दहशतवादी ठार झाले. तर १४ जणांना अटक करण्यात आली असून दोन जण शरण आले असल्याचे लष्कराने म्हटले. या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील हजारोंच्या संख्येने सुरक्षा दलात भरती होण्यासाठी आलेल्या युवकांची बातमी महत्वाची ठरते.

leave a reply