हॉर्न ऑफ आफ्रिकेतील सव्वा कोटीहून अधिकजणांवर उपासमारीचे संकट

- ‘वर्ल्ड फूड प्रोगाम’चा इशारा

उपासमारीचे संकटरोम – सलग तीन वर्षे पडलेल्या अपुर्‍या पावसाने ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ भागातील देशांमध्ये भयावह दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळामुळे सव्वा कोटींहून अधिकजण उपासमारी व अन्नटंचाईच्या खाईत लोटले गेल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने दिला आहे. ‘हॉर्न ऑफ आफ्रिका भागातील देशांमध्ये शेतीचे संपूर्ण हंगाम वाया गेले असून पाळीव पशुंचा मोठ्या प्रमाणात बळी गेला आहे. याचे भयानक परिणाम लाखो कुटुंबांना भोगावे लागत आहेत’, अशा शब्दात ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’चे वरिष्ठ अधिकारी मायकल डनफोर्ड यांनी विदारक स्थितीकडे लक्ष वेधले.

‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने मंगळवारी आफ्रिकेतील परिस्थितीबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या सोमालिया, केनिया व इथिओपियावर ओढवलेल्या मानवतावादी संकटाची माहिती देण्यात आली आहे. आफ्रिकेतील या तिन्ही देशांमध्ये गेले तीन वर्षे पुरेसा पाऊस झालेला नाही. या देशांमध्ये १९८०च्या दशकानंतरचा सर्वाधिक तीव्रतेचा कोरडा दुष्काळ पडला आहे. पाण्याचे उपलब्ध स्रोत संपले असून जमिनींना भेगा पडल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका शेती व पशुपालन करणार्‍या कुटुंबांना बसला आहे, असे ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

उपासमारीचे संकटशेतीचे हंगाम वाया गेल्याने अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून लाखो कुटुंबांवर उपासमारी व कुपोषणाची वेळ ओढवल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघटनेशी संलग्न असणार्‍या गटाने दिला. ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’च्या माहितीनुसार, सोमालिया, केनिया व इथिओपियातील एक कोटी, ३० लाखांहून अधिक नागरिकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. यातील लाखो जणांना दुष्काळ व अन्नटंचाईमुळे विस्थापित व्हावे लागल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

उपासमारीचे संकटही परिस्थिती नियंत्रणात आणायची असेल तर हॉर्न ऑफ आफ्रिकामधील तीन देशांसह इरिट्रिआमधील जवळपास दोन कोटी नागरिकांना पुढील सहा महिने अन्न व पाण्याचा पुरवठा करावा लागेल. त्यात अपयश आले तर या भागातील सुमारे १४ लाख मुले कुपोषणामुळे बळी पडतील, अशी भीती अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. योग्य सहाय्य न मिळाल्यास २०११ साली सोमालियात आलेल्या दुष्काळाप्रमाणे भयावह जीवितहानीला सामोरे जावे लागेल, असेही बजावण्यात आले. २०११ साली सोमालियात आलेल्या दुष्काळात उपासमारीमुळे तब्बल अडीच लाख जणांचा बळी गेला होता.

गेल्या वर्षी ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’ या स्वयंसेवी संस्थेने ‘हंगर पॅन्डेमिक’ असा उल्लेख करीत दुष्काळ व अन्नटंचाईच्या संकटाबाबत व्यापक अहवाल सादर केला होता. त्यात कोरोनाची साथ, वाढते संघर्ष व हवामानबदलाची समस्या यामुळे जगात दर मिनिटाला ११ जणांचा भूकबळी जात असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यात आफ्रिका खंडातील इथिओपिया व डीआर कॉंगो या देशांमधील संकटाकडे लक्ष वेधण्यात आले होते. इथिओपियात सध्या सरकार व तिगरे बंडखोरांमध्ये संघर्ष सुरू असून २० लाखांहून अधिक नागरिकांना दुष्काळ व उपासमारीच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागेल, असे संयुक्त राष्ट्रसंघटनेने बजावले आहे.

leave a reply