इराणच्या लष्कराने बळाचा वापर केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढेल

- इराणमधील विश्लेषकांचा इशारा

तेहरान – गेल्या तीन आठवड्यांपासून इराणमध्ये सुरू असलेल्या राजवटविरोधी आंदोलनामध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स व इराणच्या पोलिसांकडून निदर्शकांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. याआधीही रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी बळाचा वापर करून राजवटविरोधी आंदोलने चिरडली होती. पण सध्या सुरू असलेली निदर्शने चिरडण्यासाठी बळाचा वापर केला तर भडका उडेल, हिंसक निदर्शने पेट घेतील, असा इशारा इराणमधील विश्लेषकांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळा, कॉलेजमधील विद्यार्थीनींनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सदर विश्लेषकांनी इराणच्या राजवटीला हा सल्ला दिला आहे.

माहसा अमिनी या कुर्दवंशिय तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर इराणमध्ये भडकलेल्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पहिले काही दिवस हे आंदोलन हिजाबच्या सक्तीविरोधात होते. इराणमधील एक गट या आंदोलनाचे नेतृत्व करीत होता. पण गेल्या काही दिवसांमध्ये या आंदोलनात इराणमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील गट सहभागी झाले. यामध्ये कर्मचारी, कामगार व्यापारी वर्गाचा समावेश होता.

मात्र गेल्या आठवड्यात रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी शरीफ विद्यापीठात घुसून विद्यार्थीनींवर केलेल्या कारवाईनंतर या आंदोलनाचे स्वरूप बदलले आहे. आत्तापर्यंत या आंदोलनापासून अलिप्त राहिलेल्या शाळा, कॉलेजमधील विद्यार्थीवर्ग व त्यांचे कुटुंबिय देखील या आंदोलनात उतरले आहेत. जवळपास सात शहरांमधील विद्यापीठ तसेच शाळांमधील विद्यार्थीनींनी हिजाबवर बहिष्कार करून इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात घोषणा दिल्याचे व्हिडिओज्‌‍ समोर आले आहेत.

या पार्श्वभूमीवर, इराणमधील विश्लेषकांनी खामेनी यांच्या राजवटीला सल्ला दिला. याआधी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या कारवाईला इराणची जनता घाबरत होती. पण आत्ताच्या कारवाईने इराणी जनतेमधील राजवटविरोधात संताप तीव्र झाला आहे. त्यामुळे इराणमधील सरकारने भूसुरुंगावर पाय ठेवण्यासारख्या आत्मघाती कारवाया करू नये, असा सल्ला मोहम्मद रेझा ताजिक या विश्लेषकाने दिला. या निदर्शकांवर बळाचा वापर केला तर ते दडून बसणार नाहीत, तर संतापाने पेटून रस्त्यावर उतरतील, हा आधीच्या आणि आत्ताच्या निदर्शनांमधील फरक असल्याचे ताजिक यांनी लक्षात आणून दिले.

तर इराणच्या राजवटीने आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून यापुढेही त्यांच्यावर कारवाई सुरू ठेवली तर अधिक हिंसक आंदोलन पेट घेऊ शकते, असे इस्माईल गेरामी मोघादम या दुसऱ्या एका विश्लेषकांनी बजावले. इराणच्या कायद्यांमध्ये निदर्शनांना परवानगी आहे. तरी देखील रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स या निदर्शकांवर कारवाई करीत असल्यामुळे जनतेचा राजवटीवरील विश्वास उरलेला नाही, याकडे मोघादम यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, देशात पेटलेल्या या आंदोलनासाठी पाश्चिमात्य देश जबाबदार असल्याचा आरोप इराणच्या राजवटीकडून केला जात आहे. इराणच्या सरकारकडून आंदोलकांवर केलेल्या कारवाईवर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा या देशांकडून प्रतिक्रिया येत आहेत. हा इराणचा अंतर्गत मुद्दा असून पाश्चिमात्य देशांनी यात लुडबूड करू नये, असे इराणने फटकारले आहे. तसेच गेल्या दोन आठवड्यात दुसऱ्यांदा इराणने ब्रिटनच्या राजदूतांना समन्स बजावले आहे. तर फ्रान्सने इराणच्या नेत्यांवर निर्बंध लादण्यासाठी युरोपिय महासंघाला आवाहन केले आहे.

leave a reply