रशियाकडून रणगाड्यांच्या निर्मितीत मोठी वाढ

- सरकारी संरक्षण संस्थेची माहिती

मॉस्को – रशियाच्या कुरगांमशझावोद कारखान्याने ‘बीएमपी-3’ या प्रमुख रणगाड्यांची विक्रमी निर्मिती केली. 2019 साली, पूर्ण वर्षभरात या कारखान्यातून रणगाड्यांची निर्मिती झाली, तेवढी गेल्या तीन महिन्यात झाली आहे. ‘रोसटेक’ या रशियाच्या सरकारी संरक्षण संस्थेने ही माहिती व फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. युक्रेनकडून रशियाविरोधात मोठ्या लष्करी कारवाईचे संकेत दिले जात आहेत. अशा परिस्थितीत, रशियाने आपली शस्त्रसज्जता वाढवत नेल्याचे यामुळे समोर येत आहे.

रशियाकडून रणगाड्यांच्या निर्मितीत मोठी वाढ - सरकारी संरक्षण संस्थेची माहितीयुक्रेनचे लष्कर रशियाविरोधी युद्धासाठी पूर्णपणे अमेरिका व मित्रदेशांकडून मिळणाऱ्या लष्करी सहाय्यावर अवलंबून आहे. असे असले तरी जर्मनी व इतर काही देश संरक्षण साहित्याचा पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याची टीका युक्रेनकडून केली जात आहे. संरक्षण साहित्य मिळाले नाही तर पुढच्या काही दिवसात युक्रेन या युद्धात पराभूत होईल, असा इशारा युक्रेन व युरोपिय नेते देत आहेत.

युरोपिय देशांकडून मिळालेली लष्करी वाहने, रणगाडे, रॉकेट लाँचर्समध्ये त्रूटी असल्याचा दावा युक्रेन करीत आहे. तर अमेरिकेच्या सहकार्याने पाकिस्तानने रवाना केलेले तोफगोळे आणि रॉकेट्स अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचा जाहीर ठपका युक्रेनच्या लष्कराने ठेवला आहे. याचा थेट परिणाम रशियाबरोबरच्या युद्धात होईल, अशी चिंता युक्रेनचे लष्करी अधिकारी व्यक्त करीत आहेत.

अशा परिस्थितीत, रशियाने उरल टेकड्यांच्या भागात असलेल्या कारखान्यातून ‘बोएवाया मशिना पेहोती-बीएमपी3’ रणगाडे लष्करात सामील होण्यासाठी सज्ज झाले आहेत. 1980च्या दशकातील हे रणगाडे आजही युक्रेनबरोबरच्या युद्धात आघाडीवर असून अचूक हल्ले चढवित आहेत. रणगाड्यांच्या निर्मितीचा वेग वाढल्यामुळे येथील कारखान्यातील कामगारांची संख्या देखील वाढली असून रोजगार वाढल्याचा दावा केला जातो.

काही दिवसांपूर्वी रशियाने ‘स्प्रूट एसडीएम1’ रणगाडाभेदी लष्करी वाहनाची निर्मिती सुरू केली होती. तसेच अतिप्रगत लढाऊ विमान ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स-एआय’च्या सहाय्याने नियंत्रित करण्याची चाचणी आयोजित केली होती. त्याचबरोबर रशियाने क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचा वेग वाढविण्याची सूचनाही केली आहे.

हिंदी

 

leave a reply