भूमध्य सागरी क्षेत्रातून युरोपात घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत ३०० टक्क्यांची वाढ

- युरोपिय महासंघाच्या ‘फ्रंटेक्स एजन्सी’चा दावा

ब्रुसेल्स – भूमध्य सागरी क्षेत्रातून युरोपात होणाऱ्या निर्वासितांच्या घुसखोरीत तब्बल ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचा दावा युरोपिय महासंघाच्या ‘फ्रंटेक्स’ या यंत्रणेने केला आहे. २०२३ सालातील पहिल्या चार महिन्यातच ४० हजारांहून अधिक निर्वासितांनी भूमध्य सागरी मार्गाने युरोपात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे ‘फ्रंटेक्स’चे प्रमुख हॅन्स लेजटेन्स यांनी सांगितले. ट्युनिशिआ याचे केंद्र बनले असून या देशातून घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांमध्ये एक हजार टक्क्यांहून अधिक भर पडल्याचे लेजटेन्स यांनी बजावले. ही घुसखोरी वाढत असतानाच इटलीने निर्वासितांची तस्करी करणारी मोठी टोळी उद्ध्वस्त केल्याचे जाहीर केले आहे.

गेल्या वर्षभरात भूमध्य सागरी मार्गाचा वापर करून घुसखोरी करणाऱ्यांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. यापूर्वी गेल्या दशकात जर्मन सरकारने स्वीकारलेल्या ‘ओपन डोअर पॉलिसी’मुळे युरोपात घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. २०१५ साली भूमध्य सागरातून युरोपात घुसणाऱ्या निर्वासितांची आकडेवारी १० लाखांवर पोहोचली होती. त्यानंतर पुढील काही वर्षे भूमध्य सागरी क्षेत्रातून येणाऱ्या निर्वासितांची संख्या लाखांहून अधिक राहिली होती. २०२० व २०२१मध्ये यात प्रचंड प्रमाणात घट झाली होती.

मात्र आता पुन्हा एकदा त्यात वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे ‘फ्रंटेक्स’च्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीतून समोर येत आहे. भूमध्य सागरी क्षेत्रातील ‘सेंट्रल मेडिटेरिअन’ व ‘वेस्टर्न मेडिटेरिअन’ या दोन भागांमधून निर्वासितांची विक्रमी घुसखोरी सुरू झाली आहे. एकट्या ‘सेंट्रल मेडिटेरिअन’ भागातून जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांमध्ये ३० हजारांहून अधिक निर्वासितांची घुसखोरी झाली आहे. यात आफ्रिकी देशांसह पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांचा समावेश आहे.

२०२२ सालच्या तुलनेत घुसखोरीमध्ये तब्बल ३०५ टक्क्यांची वाढ झाल्याचे ‘फ्रंटेक्स’कडून सांगण्यात आले. या क्षेत्रात आपण इतक्या विक्रमी पातळीवर निर्वासितांची घुसखोरी झालेली पाहिली नव्हती, असा दावा ‘फ्रंटेक्स’चे प्रमुख हॅन्स लेजटेन्स यांनी केला. एकट्या ट्युनिशिआमधून युरोपात घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांमध्ये १,१०० टक्क्यांची भर पडल्याकडे लेजटेन्स यांनी लक्ष वेधले. मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी त्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ बदलल्याचा इशाराही फ्रंटेक्सच्या प्रमुखांनी दिला.

दरम्यान, घुसखोरीचे प्रमाण वाढत असतानाच युरोपिय देशांनी त्याविरोधातील कारवायांची व्याप्तीही वाढविल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच इटलीतील सुरक्षा यंत्रणांनी निर्वासितांची तस्करी करणारी एक मोठी टोळी उद्ध्वस्त केली असून २९ जणांना अटक केली. या टोळीत आखाती देशांमधील नागरिकांचा समावेश असून इटलीसह ग्रीस व तुर्कीमध्ये सदर टोळी सक्रिय होती. तर फ्रान्समधून इटलीत जाणाऱ्या निर्वासितांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन्सचा वापर करण्याचा निर्णय फ्रेंच यंत्रणांनी घेतला आहे.

हिंदी

 

leave a reply