इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांसाठी भारत-जपान एकत्र येतील

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – चीनच्या विस्तारवादी कारवाया वाढत असताना इंडो-पॅसिफिक क्षेत्रासह इतर देशांमध्ये भारत व जपान एकत्र येऊन कार्य करतील, अशी ग्वाही भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. त्याचवेळी या क्षेत्रासाठी भारत व जपानचा दृष्टिकोन समान असल्याचे सांगून सध्या या क्षेत्रात होणाऱ्या बदलांमध्ये दोन्ही देशांचे मोठे योगदान असल्याचा दावाही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केला. गेल्या आठवड्यात दोन देशांमध्ये झालेल्या संरक्षण सहकार्य कराराच्या पार्श्वभूमीवर, भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे ठरते.

भारत-जपान

भारतातील उद्योग व व्यापारविषयक संघटना ‘फिक्की’ने नुकताच भारत-जपान सहकार्यासंदर्भात अहवाल प्रसिद्ध केला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल बैठकीत, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दोन देशांमधील वाढत्या जवळीकीकडे लक्ष वेधले. ‘”भारताने ‘टू प्लस टू डायलॉग’ व वार्षिक बैठक अशा दोन्ही माध्यमांमधून जपानशी व्यापक सहकार्य विकसित केले असून, अशी व्यवस्था असणारा जपान हा एकमेव देश आहे. यावरूनच दोन देशांमध्ये दृढ झालेले संबंध, जागतिक घडामोडीबाबतचा आमचा दृष्टीकोन व समान हितसंबंध यांची कल्पना येऊ शकेल”, असे एस. जयशंकर यांनी सांगितले. यावेळी भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी इंडो-पॅसिफिक तसेच जगातील इतर भागांमध्ये भारत व जपानने एकत्र येऊन संयुक्त प्रकल्प राबविण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती दिली.

भारत-जपान‘श्रीलंकेत भारत व जपानने एकत्र येऊन संयुक्त प्रकल्पांची यशस्वी सुरुवात केली आहे. त्यापुढे जाऊन आता बांगलादेश व म्यानमारमध्ये एकत्रित सहकार्य शक्य आहे का याची चाचपणी सुरू आहे. ईशान्य भारतातील प्रकल्पांसाठी उभारलेल्या इंडिया-जपान ॲक्ट ईस्ट फोरमचा यासाठी उपयोग होऊ शकतो’, या शब्दात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दोन देशांमधील वाढत्या सहकार्याचे संकेत दिले. इंडो-पॅसिफिक क्षेत्राव्यतिरिक्त इतर भागांमध्येही अशा प्रकारचे सहकार्य शक्य असल्याचे सांगताना एस. जयशंकर यांनी, रशियाचा ‘फार ईस्ट रिजन’ व पॅसिफिकमधील ‘आयलंड नेशन्स’चा उल्लेख केला.

एखाद्या देशापेक्षा आशिया खंडाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढता प्रभाव हे खंडातील देशांचे मुख्य उद्दिष्ट असायला हवे आणि त्यासाठी मोठ्या देशांनी इतरांशी संघर्ष टाळणे महत्त्वाचे ठरेल, अशा शब्दात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला टोला लगावला. यावेळी त्यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षा व व्यापारातील ‘सप्लाय चेन’ या क्षेत्रातही भारत-जपान एकत्र येण्याचे संकेत देऊन चीनच्या विरोधातील आघाडी अधिक भक्कम होऊ शकते, असा दावा केला.

leave a reply