कंबोडियामध्ये भारत आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा

फ्नोम पेन्ह – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा पार पडली. इंडोनेशियात आयोजित करण्यात आलेल्या जी-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. इथे त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा अपेक्षित आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी कंबोडियाम भारत व अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा पार पडल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीआधी जयशंकर यांनी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही चर्चा केली होती. मंगळवारीच परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी रशियाचा दौरा करून रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्याशी चर्चा केली होती. त्या पार्श्वभूमीवर, युक्रेन व अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील जयशंकर यांच्या चर्चेचे महत्त्व वाढले आहे.

talks in Cambodiaअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याशी आपली युक्रेनचे युद्ध, जी-20, ऊर्जाविषयक समस्या आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थितीवर चर्चा पार पडल्याची माहिती जयशंकर यांनी सोशल मीडियावर दिली. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात जी-20 दरम्यान होणाऱ्या भेटीची पूर्वतयारी दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेत झाल्याची शक्यता माध्यमांकडून वर्तविली जात आहे. विशेषतः युक्रेनच्या युद्धानंतर भारत व अमेरिकेचे संबंध काहिसे ताणलेले असताना पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील या चर्चेचे महत्त्व अधिकच वाढल्याचे दिसत आहे. त्याचबरोबरच युक्रेनचे युद्ध संपविण्यासाठी भारत रशियाबरोबरील आपल्या प्रभावाचा वापर करू शकतो, ही बाब लक्षात आणून देऊन पाश्चिमात्य माध्यमेही यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध करीत आहेत. परराष्ट्रमंत्री जयशंकर व परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्यातील चर्चेकडे देखील या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.

गेल्याच मंगळवारी जयशंकर रशियाच्या दौऱ्यावर गेले होते व त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याप्रमाणेच ‘हा युद्धाचा काळ नाही’, हा संदेश रशियाला दिला होता. पाश्चिमात्य माध्यमांनी हा संदेश उचलून धरून भारत रशियावरील आपल्या प्रभावाचा वापर युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी करू शकतो, असे दावे केले होते. तसेच भारताचे युक्रेनशीही उत्तम संबंध आहेत, याचाही दाखला पाश्चिमात्य माध्यमे देत आहेत. विशेषतः अमेरिकेतील माध्यमांनी जयशंकर यांच्या रशिया भेटीत भारताकडून देण्यात आलेल्या संदेशाला विशेष प्रसिद्धी देण्यात आली होती. यानंतर अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांचा भारत दौरा पार पडला होता. या भेटीतही त्यांनी अमेरिकेला युक्रेनच्या संदर्भात भारताकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्याची चर्चा आहे.

अशा परिस्थितीत, पंतप्रधान मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील चर्चेकडे केवळ भारत आणि अमेरिकीच नाही, तर जगभरातील माध्यमांचे लक्ष लागले आहे. भारताचे रशियाबरोबरील सहकार्य अमेरिकेला मान्य नसले तरी भारताचे महत्त्व लक्षात घेता अमेरिकेला तडजोड करण्यावाचून पर्याय नाही, ही बाब विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. त्याचा प्रभावही दोन्ही नेत्यांच्या भेटीवर पडू शकतो.

leave a reply