भारत टेलिकॉम तंत्रज्ञानातील निर्यातदार देश बनत आहे

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – ‘5जी तंत्रज्ञान सर्वाधिक वेगाने स्वीकारणाऱ्या देशात भारत अव्वलस्थानी आहे. 120 दिवसात देशाच्या 125 शहरांमध्ये 5जी सेवा सुरू झाली आहे. तसेच आत्तापर्यंत देशाच्या 350 जिल्ह्यांमध्ये 5जी सेवा ‘रोलआऊट’ झाली आहे. ही सेवा सुरू होऊन सहा महिने झाले नाही तोच आपण 6जी तंत्रज्ञानावर चर्चा करू लागलो आहोत. यातून देशाचा आत्मविश्वास प्रतित होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. 4जी येण्याच्या आधी भारत हा त्याचा वापरकर्ता देश होता, पण आता भारत टेलिकॉम क्षेत्रातील निर्यातदार देश बनत आहे, असे सांगून पंतप्रधानांनी यावर समाधान व्यक्त केले.

भारत टेलिकॉम तंत्रज्ञानातील निर्यातदार देश बनत आहे -पंतप्रधान नरेंद्र मोदीनवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन-आयटीयु’च्या ‘एरिया ऑफिस’व ‘इनोव्हेशन सेंटर’च्या उद्घाटन समाहोरात पंतप्रधान बोलत होते. 4जी येण्याच्या आधी भारत याचा केवळ ग्राहक देश होता. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. 5जी तंत्रज्ञान जगात सर्वाधिक वेगाने भारतच रोलआऊट करीत आहे. अवघ्या 120 दिवसांमध्ये देशाच्या 125 शहरांमध्ये तसेच 350 जिल्ह्यांमध्ये 5जी सेवा सुरू झाली असून हा वेग पुढच्या काळात येणाऱ्या 6जीच्या पायाभरणीचे काम करीत असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.

5जी येऊन सहा महिने देखील झाले नाही तोच आपण आज 6जीवर चर्चा करीत आहोत, ही बाब देशाच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचा दाखला देते आहे, असे सांगून पंतप्रधानांनी याचे स्वागत केले. याबरोबरच येत्या काळात देशात सुमारे 100 5जी लॅब्ज्‌‍ अर्थात संशोधन केंद्र तयार करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. याद्वारे 5जी तंत्रज्ञानाचा वापर देशाच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रासाठी करण्यावर या लॅब्ज्‌‍मध्ये संशोधन केले जाईल. स्मार्ट क्लासरूमपासून ते शेतीशी निगडीत असलेल्या गोष्टींमध्ये या तंत्रज्ञानाचा कशारितीने वापर करता येऊ शकेल, यावर इथे सखोल विचार करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

‘भारत 6जी व्हिजन डॉक्युमेंट’ तसेच ‘6जी आरएनडी टेस्ट बेड’चे पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी लोकार्पण करण्यात आले. पुढच्या काळात या तंत्रज्ञानाच्या प्रमाणिकरणासाठी भारत पुढाकार घेणार असल्याची माहिती देखील यावेळी पंतप्रधानांनी दिली. तसेच ‘आयटीयु’ पुढच्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात यासंदर्भात मोठी परिषद आयोजित करणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. यासाठी जगभरातील तंत्रज्ञ व बुद्धिमंत भारतात येणार आहेत, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. यासाठी असलेला अवधी लक्षात घेता, आत्तापासूनच याची तयारी करा आणि या परिषदेत नव्या संकल्पना मांडण्यावर काम करा, असा संदेश पंतप्रधानांनी दिला. विशेषत गरीब देशांना या तंत्रज्ञानाचा कशारितीने लाभ मिळवून देता येईल, यावर विचार करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी सदर क्षेत्रात काम करणाऱ्यांना केले आहे.

हिंदी

 

leave a reply