भारत व ब्रिटनचे संबंध दीपस्तंभासारखे

भारत व ब्रिटननवी दिल्ली – भारत व ब्रिटनची भागीदारी वादळी समुद्रात दीपस्तंभासारखी उभी आहे, असा दावा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केला. हुकूमशाहीवादी देशांपासून असलेल्या धोक्यांचा उल्लेख करून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दोन्ही लोकशाहीवादी देशांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचवेळी भारत व ब्रिटनमध्ये यंदाच्या दिवाळीपर्यंत मुक्त व्यापारी करार संपन्न होईल, असा विश्वास पंतप्रधान जॉन्सन यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या भारतभेटीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा संपन्न झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये सरकारी स्तरावर दोन तर बिगर सरकारी स्तरावरील चार सामंजस्य करार संपन्न झाले. यावेळी भारताला ‘ओपन जनरल एक्सपोर्ट लायसन्स-ओजीईएल’ दिले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान जॉन्सन यांनी केली. यामुळे दोन्ही देशांमधील व्यवहारांना प्रशासकीय अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही, असे जॉन्सन पुढे म्हणाले. तसेच जॉन्सन यांच्या या भेटीत दोन्ही देशांनी भूमी, सागरी तसेच हवाई आणि सायबर क्षेत्रात संभवणाऱ्या धोक्यांच्या विरोधात एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

प्रगत श्रेणीच्या लढाऊ विमानांच्या तंत्रज्ञानासाठी भारत व ब्रिटन सहकार्य करणार आहेत. सागरी क्षेत्राबाबत दोन्ही देशांनी सहकार्य वाढविण्याचा निर्णयघेतला आहे. संरक्षणाच्या आघाडीवर भारत व ब्रिटनने सहकार्य व्यापक करणार असल्याची माहिती यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली. संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या भारताच्या मोहिमेला ब्रिटनकडून मिळत असलेल्या सहकार्याचे आम्ही स्वागत करू, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून बोरिस जॉन्सन पहिल्यांदाच भारतात येत असले, तरी ते जूने मित्र म्हणून भारताला उत्तमरित्या जाणतात. गेल्या काही वर्षात ब्रिटनचे भारताबरोबरील संबंध मजबूत झाले आहेत. त्यासाठी पंतप्रधान जॉन्सन यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान जॉन्सन यांची प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांची युक्रेनच्या समस्येवर चर्चा पार पडली. युक्रेनचे युद्ध लवकरात लवकर थांबावे व या देशात शांतता प्रस्थापित व्हावी, अशी भारताची मागणी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान जॉन्सन यांच्याबरोबरील चर्चेत स्पष्ट केले. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी ही माहिती दिली.

भारत व ब्रिटनमध्ये मुक्त व्यापारी करारावर चर्चा सुरू आहे. यावरील वाटाघाटी दिवाळीपर्यंत पूर्ण होतील व हा करार संपन्न होईल, असा विश्वास पंतप्रधान जॉन्सन यांनी व्यक्त केला. युक्रेनचे युद्ध सुरू असताना, भारताने रशियाच्या विरोधात भूमिका स्वीकारावी, अशी मागणी अमेरिकेकडून केली जात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आपल्या भारतभेटीत यासाठी आग्रह धरतील, असे दावे करण्यात येत होते. पण पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्याला रशियाबरोबरील भारताच्या ऐतिहासिक संबंधांची जाणीव असल्याचे सांगून यासंदर्भात आपण भारतावर दबाव टाकणार नसल्याचे जाहीर केले आहे.

leave a reply