सीमावाद चर्चेद्वारे सोडविण्यावर भारत व चीनचे एकमत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन/बीजिंग – लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चेची १८वी फेरी पार पडली. दोन्ही देशांना मान्य असेल, असा तोडगा काढून इथला तणाव कमी करण्यासाठी चर्चा करीत राहण्यावर दोन्ही देशांचे यावेळी एकमत झाले. त्यामुळे आधी पार पडलेल्या चर्चेपेक्षा १८व्या फेरीतील चर्चा फारशी वेगळी नसल्याचे समोर येत आहे. एससीओच्या बैठकीसाठी चीनचे संरक्षणमंत्री लवकरच भारतभेटीवर येणार आहेत. त्याच्या आधी दोन्ही देशांमधला तणाव वाढू नये, यासाठी भारत व चीन दक्षता घेत असल्याचे सदर चर्चेद्वारे समोर आले आहे. या चर्चेच्या बातम्या येत असतानाच, चीनपासून आपल्याला सर्वाधिक लष्करी धोका संभवतो, याची पुरेपूर जाणीव भारताला असल्याचे अमेरिकन संसदेचे सदस्य रो खन्ना यांनी म्हटले आहे.

सीमावाद चर्चेद्वारे सोडविण्यावर भारत व चीनचे एकमत२७ एप्रिल रोजी चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू भारतात येणार आहेत. २०२० साली लडाखच्या गलवानमध्ये भारत व चीनच्या लष्करामध्ये झालेल्या संघर्षानंतर, पहिल्यांदाच चीनचे संरक्षणमंत्री भारतात येत असल्याने, त्यांच्या या भेटीकडे जगभरातील माध्यमांचे लक्ष वेधले गेले आहे. या दौऱ्याच्या आधी लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चेची १८वी फेरी पार पडली. यातून फारसे काही हाती लागले नसले, तरी हा वाद अधिक चिघळणार नाही, यासाठी भारत व चीननेही पुढाकार घेतल्याचे दिसते आहे. एससीओच्या यशस्वी आयोजनासाठी दोन्ही देशांनी हा सावध पवित्रा स्वीकारल्याचे दिसते.

दरम्यान, या चर्चेच्या बातम्या येत असताना, अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ‘हूवर इन्स्टीट्यूशन’ने आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलताना अमेरिकन काँग्रेसचे सदस्य रो खन्ना यांनी चीनवर तोफ डागली. पाकिस्तान नाही, तर चीनपासून आपल्याला सर्वाधिक लष्करी धोका संभवतो, याची पुरेपूर जाणीव भारताला आहे, असे काँग्रेसमन खन्ना यावेळी म्हणाले. तसेच चीनच्या आक्रमकतेचा सामना करताना अमेरिकेने चार मुद्यांचा पुरस्कार करावा, असे खन्ना यांनी आपल्या व्याख्यानात सुचविले.

सीमावाद चर्चेद्वारे सोडविण्यावर भारत व चीनचे एकमतयामध्ये अमेरिका-चीनमधील व्यापाराचे संतुलन राखणे, चीनशी वाटाघाटी करीत राहणे, चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्करी सामर्थ्य वाढविणे व अमेरिकेच्या आशियातील भागीदार देशांचा आदर करण्यास चीनला भाग पाडणे, अशा चार मुद्यांचा समावेश आहे. याबरोबरच अमेरिकेने चीनपासून संभवणारा धोका टाळण्यासाठी भारताबरोबरील आपले सहकार्य अधिक व्यापक करावे व भारताला लष्करी सहाय्य पुरवावे, असा सल्लाही रो खन्ना यांनी दिला.

तर चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने भारताला अमेरिकेपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. भारताने अमेरिकेच्या भूलथापांना बळी पडू नये. कारण अमेरिकेला भारत व चीनमध्ये संघर्ष घडवून आणायचा आहे. या दिशेने अमेरिकेचे नेते, अभ्यासगट काम करू लागले असून अमेरिकेच्या गुप्तचर संस्था यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा दावा ग्लोबल टाईम्सने दिला. याच कारणामुळे सीमावादात अमेरिका भारताची बाजू घेत आहे, पण कालांतराने यामुळे भारताचे नुकसान होऊ शकते, असा दावा चीनच्या सरकारी मुखपत्राने केला आहे. एकमेकांच्या विरोधात खडे ठाकण्यापेक्षा भारत व चीनने राजनैतिक वाटाघाटींद्वारे आपले वाद सोडवावे आणि अमेरिकेचा डाव हाणून पाडावा, असे आवाहन ग्लोबल टाईम्सने केले आहे.

leave a reply