इराणमधील छाबहार-झाहेदन रेल्वे प्रकल्पासाठी भारत वचनबद्ध

- परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन

नवी दिल्ली – इराणमध्ये उभारण्यात येणार्‍या ‘छाबहार-झाहेदन’ रेल्वे प्रकल्पासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली. लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी या रेल्वेप्रकल्पाबरोबरच इराणमधील इतर विकासप्रकल्पांमध्येही भारताचा सहभाग असल्याची माहिती दिली आहे. गेल्या वर्षी, इराणने आपल्या छाबहार बंदराच्या विकास प्रकल्पातून भारताला बाजूला सारले, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

मात्र त्यानंतर भारताने इराण व अफगाणिस्तानबरोबरच इतर मध्य आशियाई देशांशी सहकार्य वाढविल्याचे समोर आले होते. ‘भारताच्या पंतप्रधानांनी २०१६ साली केलेल्या इराण दौर्‍यात भारतीय रेल्वेचा भाग असलेली इरकॉन व इराणी रेल्वेच्या सीडीटीआयसीमध्ये छाबहार-झाहेदन रेल्वे प्रकल्पासाठी परस्पर सामंजस्य करार करण्यात आला होता. छाबहार-झाहेदन रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी भारत वचनबद्ध असून इराणबरोबर पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. इराणमधील इतर विकासप्रकल्पांसाठीही भारताचे सहकार्य सुरू आहे’, असे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले.

गेल्या वर्षी चीनने इराणमध्ये ४०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करीत असल्याची घोषणा करून खळबळ उडवली होती. चीन-इराणमधील या वाढत्या सहकार्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताची छाबहारमधील गुंतवणूक अडचणीत येईल, असे संकेत देण्यात आले होते. मात्र भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या वर्षी इराणला दिलेल्या धावत्या भेटीनंतर सर्व काही आलबेल असल्याची ग्वाही दोन्ही देशांकडून देण्यात आली होती. उलट भारताने छाबहारच्या माध्यमातून इतर मध्य आशियाई देशांबरोबर व्यापारी मार्गाच्या उभारणीसाठी हालचाली सुरू केल्याचे समोर आले होते.

काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात भारताच्या अर्थमंत्र्यांनी छाबहार प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचेही जाहीर केले होते. त्यापूर्वी गेल्या महिन्यात भारताने इराणला छाबहार बंदरासाठी दोन १४० टनांच्या ‘मोबाईल हार्बर क्रेन्स’ दिल्याचेही समोर आले आहे. भारत पूर्वीप्रमाणेच इराणकडून इंधनाची आयात सुरू करेल, असेही संकेतही भारताकडून देण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी दिलेली ग्वाही भारत-इराण सहकार्य कायम असल्याची पुष्टी देणारी ठरते.

leave a reply