‘जैश’ व ‘लश्कर’चा उल्लेख नसलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविषयक अहवालावर भारताचे टीकास्त्र

– न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासचिवांनी दहशतवादी गटांच्या कारवायांसंदर्भात तयार केलेल्या अहवालात पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ व ‘लश्कर-ए-तोयबा’चा उल्लेख नाही. यावर भारताने टीकेची झोड उठविली आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत टी. एस. तिरूमुर्ती यांनी यावेळी तालिबानच्या ‘हक्कानी नेटवर्क’ या दहशतवादी गटाचा उल्लेख करून हा गट ‘आयएस’, ‘अल कायदा’ यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध ठेऊन आहे, याकडे लक्ष वेधले.

सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आल्यानंतर भारत दहशतवादविरोधी कारवाया व सागरी सुरक्षेला प्राधान्य देईल - संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत तिरूमुर्तीसंयुक्त राष्ट्रसंघटनेने नुकताच ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेपासून आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला असलेला धोका, या विषयावर एक अहवाल प्रसिद्ध केला. सुरक्षा परिषदेत आयोजित केलेल्या ‘थ्रेट टू इंटरनॅशनल पीस ऍण्ड सिक्युरिटी कॉज्ड् बाय टेररिस्ट ऍक्टस्’ या विषयावरील बैठकीत सदर अहवालावर चर्चा पार पडली. या चर्चेत भारताने पाकिस्तानला लक्ष्य करून या देशातील दहशतवादी संघटनांचा उल्लेख टाळल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘‘‘जैश-ए-मोहम्मद व लश्कर-ए-तोयबा यासारख्या दहशतवादी गटांचा इतर दहशतवादी संघटनांबरोबर असलेल्या संबंधांबद्दल भारताने वारंवार लक्ष वेधले आहे. हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानकडून मिळणारे समर्थन आणि दक्षिण आशियातील आयएस-के व अल कायदा या दहशतवादी गटांशी असलेले त्याचे संबंध, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारताने वारंवार हा मुद्दा उठविल्यानंतरही महासचिवांच्या अहवालात त्याची नोंद नाही. पुढील अहवालात सर्व सदस्य देशांकडून मिळणार्‍या माहितीचा उल्लेख असेल अशी अपेक्षा आहे’’, अशा शब्दात भारताने यावर नाराजी व्यक्त केली.

‘भारताने आपल्या शेजारी देशात वाढत असलेल्या दहशतवादाच्या धोक्याकडे सातत्याने लक्ष वेधले आहे. भारताने यासंदर्भात व्यक्त केलेली भीती, अफगाणिस्तानात बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर अधिक तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे’, असेही भारताच्या राजदूतांनी यावेळी स्पष्ट केले. तालिबानने तुरुंगातून कैदी सोडून दिल्यानंतर ‘आयएस-के’ या दहशतवादी गटाची सदस्य संख्या जवळपास दुपटीने वाढली, याची आठवणीही तिरूमुर्ती यांनी करून दिली.

leave a reply