चीनसारख्या कुटील हेतू असलेल्या देशावर भारत अवलंबून आहे

- केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल

कुटील हेतूनवी दिल्ली – चीनसारख्या कुटील हेतू असलेल्या देशावर आपण अवलंबून आहोत, याची जाणीव भारताने ठेवायला हवी, अशा परखड शब्दात केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी देशाला इशारा दिला. चीनबरोबरील द्विपक्षीय व्यापारात भारताला सहन कराव्या लागत असलेल्या वित्तीय तूटीचा दाखला देऊन व्यापारमंत्र्यांनी देशाला हा इशारा दिला आहे. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोयल बोलत होते. चीनबरोबरील व्यापारात भारताला सहन कराव्या लागत असलेल्या तुटीचा दाखला देऊन, गोयल यांनी भारताने आपल्याकडे अधिक क्षमता असलेल्या क्षेत्रात देखील चीनला शिरकाव करण्याची संधी दिल्याचा दावा केला.

यावर्षाच्या एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत चीनबरोबरील व्यापारात भारताला 51.5 अब्ज डॉलर्सची तूट सहन करावी लागली, अशी माहिती व्यापारमंत्री गोयल यांनी दिली. 2004 सालापर्यंत चीनबरोबरील व्यापारात भारताला केवळ 1.5 अब्ज डॉलर्सची तूट स्वीकारावी लागत होती. तर 2014-15च्या वित्तीय वर्षात ही तूट 48.4 अब्ज डॉलर्सवर गेली. कारण भारताने औषधनिर्मिती तसेच आपला प्रभाव असलेल्या क्षेत्रामध्ये चीनला शिरकाव करण्याची संधी दिली. याचा पुरेपूर फायदा चीनने घेतला आणि भारतातील निर्यात वाढविली, याकडे पियूष गोयल यांनी लक्ष वेधले.

यामुळे भारतातील उद्योग मोठ्या प्रमाणावर चीनमधून येणाऱ्या निर्यातीवर अवलंबून राहिले. यामध्ये औषधनिर्मिती क्षेत्रापासून ते इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचाही समावेश असल्याचे व्यापारमंत्र्यांनी स्पष्ट केले. आत्ताच्या काळात आपण चीनवर किती प्रमाणात अवलंबून आहोत, याची भारताला जाणीव असलीच पाहिजे, अशा खरमरीत शब्दात व्यापारमंत्र्यांनी यावरील आपली नाराजी व्यक्त केली. भारतासारखी मोठी बाजारपेठ असेलला देश दुसऱ्या देशातून निकृष्ट दर्जाचा माल मागवत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, असे सांगून गोयल यांनी यावर परखड शब्दात टीका केली. आधीच्या काळात सदोष धोरणे स्वीकारल्यामुळे झालेली ही हानी भरून काढण्यासाठी केंद्र सरकार झपाट्याने पावले टाकत आहे. पण ही कसर भरून काढणे सोपे नसून त्यासाठी अधिक वेळ लागेल, असेही व्यापारमंत्री गोयल यांनी स्पष्ट केले.

चीनमधून आयात कमी करण्यासाठी भारताने देशातच मोबाईल फोनच्या उत्पादनाला चालना दिली व त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. आत्ताच्या घडीला भारतात मोबाईलची निर्मिती करणाऱ्या 200 कंपन्या कार्यरत आहेत.

यामुळे मोबाईल फोन्सची इकोसिस्टीम तयार झालेल्या भारतातून आता मोबाईल फोन्सची आयात नाही, तर निर्यात केली जात आहे. उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने ‘प्रॉडक्शन लिंक इन्सेटिव्ह-पीएलआय’ योजना राबविली आहे. यामुळे देशातील उत्पादनाला गती मिळाली आहे. पुढच्या काळात याचे परिणाम दिसू लागतील व भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होईल, याकडे पियूष गोयल यांनी लक्ष वेधले.

असे असताना देखील चीनकडून भारत करीत असलेल्या आयातीचे प्रमाण वाढले आहे, हे व्यापारमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या आपल्या उत्तरात मान्य केले. सध्याच्या काळात चीनमधून येणारी आयात वाढली असली, तरी त्याचा अर्थ भारतातील आर्थिक उलाढाली वाढल्या आहेत असा होतो, असे सांगून गोयल यांनी पुढच्या काळात चीनची आयात कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

हिंदी

leave a reply