भारत बांगलादेशचा सच्चा मित्र

- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना

नवी दिल्ली – ‘बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी तीस लाख जणांनी बलिदान दिले. यामध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दिलेल्या बलिदानाचाही समावेश आहे. भारत खर्‍या अर्थाने बांगलादेशचा सच्चा मित्रदेश आहे’, अशा शब्दात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भारताने पाकिस्तानचा पराभव करून १९७१ सालचे युद्ध जिंकले आणि बांगलादेशची निर्मिती झाली. त्याला ४९ वर्षे पूर्ण झाली असून त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना सहभागी झाल्या होत्या. यावेळी पंतप्रधान शेख हसिना यांनी भारताचे आभार मानत असताना, आपला देश धार्मिक कट्टरतेला थारा देणार नाही, असे ठासून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४९ व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून बांगलादेशाचे अभिनंदन केले. भारताच्या शेजारी देशांना प्राधान्य देण्याच्या धोरणाचा बांगलादेश महत्त्वाचा स्तंभ असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. बांगलादेशच्या मुक्ती वाहिनीसोबत भारतीयांनी मिळविलेल्या या विजयाचा आनंद साजरा करीत असताना आपल्याला फार मोठा अभिमान वाटत आहे. पंतप्रधानपदावर आल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपण बांगलादेशबरोबरील संबंध अधिक दृढ करण्याला प्राधान्य दिले होते, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. दरम्यान, या व्हर्च्युअल कार्यक्रमादरम्यान दोन्ही देशांमध्ये सात सामंजस्य करार संपन्न झाले आहेत.

यामध्ये १९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धापासून बंद पडलेली चिलाहाटी-हल्दीबारी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. यामुळे आसाम व पश्‍चिम बंगाल या राज्यांचे बांगलादेशबरोबरील दळणवळण अधिकच वाढेल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो. तसेच पंतप्रधान मोदी व पंतप्रधान हसिना यांनी दोन्ही देशांमध्ये वाहणार्‍या नद्यांच्या पाणी वाटपाचा प्रश्‍न समोपचाराने सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. याबरोबर दोन्ही देशांमधील सीमेवर कुंपण टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याला गती देण्यावरही दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

यावेळी बोलताना पंतप्रधान शेख हसिना यांनी भारताच्या सरकार व जनतेने तसेच लष्कराने बांगलादेशच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला व त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याचवेळी भारताच्या मेजर अशोक तारा यांनी पाकिस्तानी लष्कराच्या कचाट्यातून आपल्या कुटुंबाला सोडविले होते, याच्याही आठवणी जागविल्या. ७१ सालच्या युद्धात पराभूत झालेल्या शक्ती आजही बांगलादेशी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यापासून जनतेने सावध रहावे, असे आवाहन पंतप्रधान शेख हसिना यांनी केले. तसेच बांगलादेशच्या निर्मितीसाठी इस्लामधर्मिय, हिंदू, ख्रिस्ती व बौद्धांनीही आपले रक्त सांडले आहे, याची आठवण शेख हसिना यांनी करून दिली. बांगलादेश धार्मिक आहे, पण या देशात धार्मिक कट्टरतेला स्थान दिले जाणार नाही, असे पंतप्रधान शेख हसिना यांनी ठासून सांगितले.

भारत व बांगलादेशमध्ये वाहणार्‍या तिस्ता नदीचे पाणीवाटप, रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्‍न आणि सीमावाद यासारख्या समस्यांमुळे बांगलादेश भारतापासून दूर चालला आहे, असा समज पाकिस्तानने करून घेतला होता. याचा लाभ घेऊन पाकिस्तानने बांगलादेशबरोबरील सहकार्य वाढवावे, असे पाकिस्तानातील काही भारतद्वेष्टे विश्‍लेषक आपल्या सरकारला सुचवित होते. मात्र काही दिवसांपूर्वी पंतप्रधान शेख हसिना यांनी ७१ सालच्या युद्धात पाकिस्तानी लष्कराने केलेले अत्याचार आपला देश कधीही विसरणार नाही, असे सांगून पाकिस्तानला चपराक लगावली होती.

भारताचे चीनबरोबरील संबंध बिघडलेले असताना, बांगलादेशचा भारताच्या विरोधात वापर करण्यासाठी चीनचीही धडपड सुरू आहे. भारत आणि चीनमधील व्यापारी तसेच इतर आघाड्यांवरील स्पर्धेचा आपल्या देशाच्या उन्नतीसाठी वापर करणार्‍या बांगलादेशच्या सरकारने, भारताच्या विरोधात भूमिका स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे चीनबरोबरील भारताचे संबंध तणावपूर्ण बनलेले असताना, भारताचे बांगलादेशबरोबर वाढत असलेले सहकार्य महत्त्वाची बाब ठरते.

leave a reply