भारत डी-डॉलरायझेशनला वेग देत आहे

चीनच्या सरकारी मुखपत्राचा दावा

बीजिंग – अमेरिका ज्या भारताचा चीनच्या विरोधात वापर करू पाहत आहे, तो भारतच डी-डॉलरायझेशनला वेग देत आहे, असा दावा चीनच्या सरकारी वर्तमानपत्राने केला आहे. द्विपक्षीय व्यापारातून डॉलरचा वापर कमी करून भारत रुपयामध्ये व्यापार करण्याला प्राधान्य देत आहे. ही बाब भारताचाही डॉलरवर तितकासा विश्वास राहिलेला नाही, हे दाखवून देत असल्याचे चीनचे सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाईम्स’चे म्हणणे आहे. अमेरिकन डॉलरच्या जागी आपल्या युआनला आंतरराष्ट्रीय चलन बनविण्याची तयारी चीनने केली आहे. या पार्श्वभूमीवर, चीनने यासंदर्भात नोंदविलेला निष्कर्ष महत्त्वाचा ठरतो. पण भारत डॉलरच्या ऐवजी युआनचा वापर करण्याची शक्यता सध्या तरी दृष्टीपथात नाही.

india rupee-dollarभारत व बांगलादेशमधील द्विपक्षीय व्यापारातून डॉलरचा वापर कमी झाला आहे. दोन्ही देश आता रुपया व टका या चलनामध्ये व्यवहार करीत आहेत, याचा दाखला ग्लोबल टाईम्सने दिला. इतकेच नाही तर ज्या देशांच्या परकीय गंगाजळीत डॉलर्स उपलब्ध नाहीत, त्या देशांचे चलन व आपल्या रुपयामध्ये व्यवहार करण्याची तयारी भारताने केलेली आहे. भारताच्या या धोरणामुळे डॉलरचा वापर अधिकच कमी होईल. त्याचवेळी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांबरोबर भारताचा व्यापार वाढेल, असा दावा ग्लोबल टाईम्सने केला. त्याचवेळी भारत डॉलर बाजूला सारून आपल्या रुपयामध्ये व्यवहार करण्यासाठी सज्ज झाल्याचे यामुळे उघड झाले आहे, असेही ग्लोबल टाईम्सच्या बातमीत नमूद करण्यात आले आहे.

भारताच्या रुपयामध्ये व्यवहार करण्यासाठी रशिया, जर्मनी, ब्रिटन, सिंगापूर, श्रीलंका, मलेशिया, ओमान, न्यूझीलंड व बांगलादेश तसेच आणखी काही देशांनी तयारी दाखविलेली आहे. याद्वारे भारताच्या महत्त्वाकांक्षा व वाढते महत्त्व अधोरेखित होत आहेच. पण अमेरिकेने स्वीकारलेल्या धोरणांमुळे भारताचा डॉलरवरील विश्वास अधिकच कमी झाल्याने भारताने हे धोरण स्वीकारल्याचा दावा ग्लोबल टाईम्सने केला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय चलन म्हणून अमेरिकेच्या डॉलरला असलेले स्थान धोक्यात आल्याचा इशारा जगभरातील अर्थतज्ज्ञ देत आहेत. रशिया तसेच अन्य देशांवर निर्बंध लादताना अमेरिकेने डॉलरचा हत्यारासारखा वापर केला खरा. पण ही बाब आता अमेरिकेवरच उलटली असून यामुळे डॉलर बाजूला सारून व्यवहार करण्यासाठी रशियाने पुढकार घेतला आहे.

याचा फायदा घेऊन चीनने आपल्या युआन चलनाला आंतरराष्ट्रीय चलन म्हणून स्थान मिळावे, यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. चीनच्या ब्राझिलबरोबरील व्यापारातून डॉलर वजा झाला असून दोन्ही देश आपापल्या चलनांमध्ये व्यवहार करणार असल्याचे उघड झाले आहे. ग्लोबल टाईम्सच्या या बातमीत त्याचीही नोंद करण्यात आली आहे. मात्र काहीही झाले तरी, अपारदर्शक आर्थिक व्यवस्था आणि चलनाचे मुल्य जाणीवपूर्वक कमी ठेवून व्यापारी लाभ उकळणाऱ्या चीनच्या चलनावर भारतासारखा देश विश्वास ठेवणे अवघड आहे. त्यामुळे चीनने कितीही प्रशंसा केली, तरी भारत द्विपक्षीय व्यापारासाठी युआनचा वापर करणे शक्य नाही.

leave a reply