युक्रेनची समस्या सोडविण्यासाठी भारत शक्य ते प्रयत्न करीत आहे

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

ऑकलंड – युक्रेनची समस्या सोडविण्यासाठी शक्य ते सारे काही करण्याची भारताची तयारी आहे. याआधी झॅपोरिझिआ येथील अणुप्रकल्पाच्या सुरक्षेसाठी रशियावर दबाव टाका, अशी विनंती भारताला करण्यात आली होती. यानुसार भारताने रशियाकडे या अणुप्रकल्पाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून दबाव टाकला होता, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. युक्रेनच्या युद्धासंदर्भातील इतर देश व संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारतासमोर चिंता व्यक्त करण्यात येतात व भारत त्याला प्रतिसाद देत असून या समस्या सोडविण्यासाठी आपल्या परिने सहाय्य करीत आहे, असे जयशंकर पुढे म्हणाले. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केलेल्या विधानांचे महत्त्व वाढले आहे.

S. Jaishankarपरराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये बोलताना जयशंकर यांनी युक्रेनच्या मुद्यावर महत्त्वाची माहिती दिली. युक्रेनचे युद्ध सुरू असताना, वेगवेगळे देश आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी काम करीत आहे. यासंदर्भात हे देश आपल्या भूमिका मांडत आहेत. भारत देखील आपले राष्ट्रीय हित आणि आंतरराष्ट्रीय हित देखील डोळ्यासमोर ठेवून आपले म्हणणे मांडत आहे. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या निमित्ताने काही देशांनी युक्रेनच्या युद्धासंदर्भातील आपल्या चिंता भारताकडे व्यक्त केल्या होत्या. संयुक्त राष्ट्रसंघानेही यासंदर्भातील चिंता भारतासमोर मांडल्या आणि भारताने त्याला प्रतिसाद दिला, अशी लक्षवेधी विधाने जयशंकर यांनी यावेळी केली.

झॅपोरिझिआ या युक्रेनच्या भूभागात युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. झॅपोरिझिआचा ताबा रशियन सैन्याने घेतला असून यानंतर सदर प्रकल्पाच्या भागात युक्रेनी लष्कर व रशियन सैन्याचा संघर्ष सुरू झाला होता. युक्रेनचे लष्कर या अणुप्रकल्पावर रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे आरोप रशियाने केले होते. त्याचवेळी रशियापासूनच सदर अणुप्रकल्पाला धमेका असल्याचा आरोप युक्रेन व पाश्चिमात्य देशांनी केले होते. या पार्श्वभूमीवर, झॅपोरिझिआच्या अणुप्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात भारताने रशियावर दबाव टाकावा, अशी मागणी संयुक्त राष्ट्रसंघाने केली होती. त्यानुसार भारताने रशियाबरोबरील चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला व रशियावरील आपल्या प्रभावाचा वापर भारताने केल्याचे संकेत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिले.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी हे दावे करण्याच्या दोन दिवस आधी भारताच्या पंतप्रधानांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी युद्धाने युक्रेनची समस्या सुटणार नसल्याचे लक्षात आणून दिले. राजकीय वाटाघाटींनीच युक्रेनची समस्या सुटेल व यासाठी भारत योगदान द्यायला तयार आहे, असा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला. त्याचवेळी युक्रेनमधील अणुप्रकल्पाच्या सुरक्षेवरही पंतप्रधान मोदी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती.

भारताच्या पंतप्रधानांनी दिलेल्या प्रस्तावावर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया आली व त्यांनी भारताच्या पंतप्रधानांचे आभार मानले होते. यानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी न्यूझीलंडमध्ये बोलताना युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी तसेच त्याची तीव्रता कमी करण्यासाठी भारत करीत असलेल्या प्रयत्नांचा दाखला दिला आहे. फ्रान्सच्या भारतातील राजदूतांनीही युक्रेनच्या युद्धासंदर्भात आपला देश भारताच्या संपर्कात असल्याची माहिती दिली होती. तसेच भारत हे युद्ध रोखण्यासाठी व त्याची तीव्रता कमी करण्यासाठी फ्रान्सच्या सहकार्याने बरेच काही घडवून आणू शकतो, असे फ्र्रान्सचे राजदूत म्हणाले होते.

दरम्यान, रशियावर प्रभाव असलेल्या काही मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे, म्हणूनच भारत रशियावर दडपण टाकून युक्रेनचे युद्ध थांबवू शकेल, असे संकेत इतर देशांच्या नेत्यांनी दिले होते. रशियावरील हा प्रभाव भारताने स्वीकारलेल्या तटस्थतेमुळे कायम असल्याची जाणीव भारताला आहे. त्यामुळे या तटस्थ धोरणाशी तडजोड करून रशियाच्या विरोधात भूमिका घेण्यास भारत तयार नाही. मात्र आंतरराष्ट्रीय हिताच्या मुद्यावर भारत रशियाशी नक्कीच चर्चा करील, असा संदेश परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या विधानांद्वारे दिला जात आहे.

leave a reply