भारत जपानसारखे अमेरिकाधार्जिणे धोरण स्वीकारणार नाही

- चीनच्या सरकारी मुखपत्राचा दावा

बीजिंग – अमेरिका व भारतामध्ये पार पडलेल्या ‘इनिशिएटीव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी’वरील (आयसीईटी) चर्चेची दखल चीनने घेतली आहे. चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने प्रगत तंत्रज्ञान पुरविण्याचा दावा करून अमेरिका भारताला चीनच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला. मात्र अमेरिका विश्वासार्ह देश नाही, याची जाणीव असलेला भारत अमेरिकेच्या चीनविरोधी आघाडीचा भाग बनणार नाही. भारताचे परराष्ट्र धोरण जपानसारखे अमेरिकाधार्जिणे नाही, असा दावा चीनच्या या दैनिकाने केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची भारतापेक्षाही चीनलाच अधिक काळजी वाटत असल्याचे ग्लोबल टाईम्समधील या लेखामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल दोन्ही देशांमधील ‘आयसीईटी’ परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यांची अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. भारत व अमेरिकेमध्ये प्रगत तंत्रज्ञानाच्या आघाडीवर सहकार्य विकसित करण्यासाठी आयसीईटीची स्थापना करण्यात आली होती. यानुसार दोन्ही देश आर्टिफिशल इंटेलिजन्स तसेच इतर अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या आघाडीवर संयुक्तरित्या संशोधन व निर्मिती करणार आहेत. भारत व अमेरिकेमधील हे सहकार्य चीनला खुपत असल्याचे ग्लोबल टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाने दाखवून दिले.

भारत संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रांसाठी मोठ्या प्रमाणात रशियावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत भारताला संरक्षणक्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान पुरविण्याचा दावा करून अमेरिका रशिया व चीनच्या विरोधात भारताला उभे करण्याचा प्र्रयत्न करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला रशिया युक्रेनच्या युद्धात गुंतल्याने आपल्याला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करू शकणार नाही, अशी चिंता वाटत असलेला भारत अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांची खरेदी करण्याचा विचार करीत आहे. मात्र काही झाले तरी अमेरिका आपल्याला प्रगत तंत्रज्ञान पुरविणार नाही, याची जाणीव भारताला आहे. अमेरिका विश्वासार्ह देश नाही, हे देखील भारताला ठाऊक आहे. अशा परिस्थितीत भारताला रशिया व चीनच्या विरोधात वापर करण्याचे स्वप्न अमेरिकेने पाहू नये, हे स्वप्न भंगल्यावाचून राहणार नाही, असा दावा चीनच्या या सरकारी दैनिकाने केला.

याबरोबरच भारत म्हणजे अमेरिकाधार्जिणे धोरण स्वीकारणारा जपानसारखा देश नाही, अशी प्रशंसाही या लेखात करण्यात आलेली आहे. भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र असून अजूनही भारताने अमेरिकेच्या नादी लागून चीनच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. उलट भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र असून कुठल्याही गट-तटामध्ये सहभागी न होता त्यापासून अलिप्त राहण्याचे धोरण भारताने स्वीकारले होते. भारत हे धोरण बदलणार नाही, असा विश्वास ग्लोबल टाईम्सच्या या लेखात व्यक्त करण्यात आलेला आहे.

भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या स्वातंत्र्य व समतोलावर चीनकडून दाखविण्यात येत असलले विश्वास ही लक्षणीय बाब ठरते. भारताने अनेक आघाड्यांवर दाखविलेल्या औदार्य व सहिष्णुतेचा गैरफायदा घेणाऱ्या चीनसारख्या देशाला आपल्या विरोधात अमेरिकेने उघडलेल्या आघाडीमध्ये सहभागी होऊ नये असे वाटते. मात्र भारताच्या शेजारी देशांचा वापर करून चीन भारताच्या विरोधात आघाडी उघडण्यासाठी नेहमीच तत्पर असल्याचे वारंवार समोर आले होते. त्यामुळे ग्लोबल टाईम्ससारख्या आपल्या सरकारी वर्तमानपत्राचा वापर करून चीन करीत असलेल्या भारताच्या प्रशंसेला काडीचाही अर्थ नाही. उलट त्यातून चीनचा मतलबीपणा अधिक प्रकर्षाने समोर येत आहे.

leave a reply