आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताची प्रशंसा

- भारताच्या कल्याणकारी योजना ‘लॉजिस्टिक मार्व्हल’ असल्याचा नाणेनिधीच्या अधिकाऱ्यांचा दावा

भारताची प्रशंसावॉशिंग्टन – सारे जग आर्थिक मंदीच्या छायेत असताना, भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चमकत्या ताऱ्यासारखी प्रकाशमान झालेली आहे, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताची प्रशंसा केली. मात्र दहा ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी भारताला रचनात्मक सुधारणा घडवाव्या लागतील, असा सल्ला नाणेनिधीच्या प्रमुख आर्थिक सल्लागारांनी दिला. त्याचवेळी आपल्या महाकाय देशातील गोरगरीबांना थेट सहाय्य पुरविण्यासाठी भारताने राबविलेल्या योजना म्हणजे ‘लॉजिस्टिक मार्व्हल’ अर्थात पुरवठ्याच्या आघाडीवरील चमत्कार ठरतो. यापासून इतर देशांनी धडे घेण्याची आवश्यकता असल्याचे नाणेनिधीने म्हटले आहे.

युक्रेनच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे विपरित परिणाम साऱ्या जगावर होत आहेत. अन्नधान्य व इंधनाची टंचाई तसेच उत्पादनाची पुरवठा साखळी बाधित झाल्याने जगभरातील प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्था धोक्यात आल्या आहेत. अगदी अमेरिकेसारख्या महासत्तेलाही मंदीला तोंड द्यावेच लागेल व इतर देश देखील आर्थिक मंदीच्या भोवऱ्यात अडकतील असा इशारा अर्थतज्ज्ञ देत आहेत. मात्र अशा परिस्थितीत, भारत एखाद्या चमकत्या ताऱ्याप्रमाणे प्रकाशमान असून भारतीय अर्थव्यवस्था उत्तम कामगिरी करीत असल्याचा निर्वाळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख आर्थिक सल्लागार पेरी-ऑलिव्हर गॉरिन्चास यांनी दिला. याआधीही नाणेनिधीने प्रमुख देशांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थाच पुढच्या वित्तीय वर्षात सर्वाधिक वेगाने प्रगती करील, असा निष्कर्ष नोंदविला होता.

भारताची प्रशंसासध्या भारत ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. पण आपली अर्थव्यवस्था दहा ट्रिलियन डॉलर्सवर नेण्यासाठी भारताला आपल्या अर्थकारणात रचनात्मक सुधारणा कराव्या लागतील, अशी स्पष्टोक्ती पेरी-ऑलिव्हर गॉरिन्चास यांनी केली. यातल्या काही सुधारणांची सुरूवात भारताने केलेली आहे. पण पुढच्या काळात ही प्रक्रिया अधिक गतीमान करावी लागेल. भारताकडे १० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता आहे, असे पेरी-ऑलिव्हर गॉरिन्चास पुढे म्हणाले. विशेषतः डिजिटायझेशनच्या आघाडीवर भारताने केलेल्या प्रगतीची गॉरिचास यांनी प्रशंसा केली.

पुढच्या वर्षी भारत जी-२० परिषदेचे आयोजन करीत आहे. सध्या जगभरात सुरू असलेल्या भू-राजकीय घडामोडी पाहता, या परिषदेचे आयोजन करणे तितकेसे सोपे नसेल, याची जाणीव पेरी-ऑलिव्हर गॉरिन्चास यांनी करून दिली. मात्र प्रमुख देशांना या परिषदेद्वारे एकत्र आणण्यात भारताला यश मिळाले, तर ती फार मोठी बाब ठरेल, असा विश्वासही गॉरिन्चास यांनी व्यक्त केला. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ‘फिस्कल अफेअर्स डिपार्टमेंट’चे उपसंचालक पाओलो माउरो यांनी भारताने गोरगरीबांना थेट सहाय्य पुरविण्यासाठी राबविलेल्या कल्याणकारी योजना म्हणजे ‘लॉम्जिस्टिक मार्व्हल’ अर्थात पुरवठ्याच्या आघाडीवरचा चमत्कार ठरतो, अशी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.

‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर-डीबीटी’ अर्थात या कल्याणकारी योजना ज्यांच्यासाठी राबविल्या जात आहेत, त्यांच्यापर्यंत याचे थेट लाभ पोहोचविण्यासाठी भारताने योग्य ती पावले उचलली. या लाभार्थींच्या खात्यामध्ये थेट सहाय्य पोहोचते आणि यामुळे पारदर्शकता राखली जाते आणि मध्यस्थांमुळे होणारा अपहार टाळता जातो, असे पाओलो माउरो म्हणाले.

२०१३ सालापासून आत्तापर्यंत भारत सरकारने २४.८ लाख कोटी रुपये इतकी रक्कम कल्याणकारी योजनांद्वारे आपल्या जनतेपर्यंत पोहोचविली आहे. २०२१-२२ या वित्तीय वर्षातच ६.३ लाख कोटी रुपयांचे सहाय्य भारताने गरजूंपर्यंत पोहोचविले होते. महिला, वयोवृद्ध आणि शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या या कल्याणकारी योजनांचे थेट लाभ गरजूंना मिळत आहेत. भारतासारख्या विशाल जनसंख्या असलेल्या मोठ्या देशात अशारितीने सहाय्य पुरविणे हा चमत्कारच ठरतो. भारताने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे शक्य करून दाखविले. त्यासाठी आधार कार्डासारख्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम’चा वापर केला, असे सांगून यापासून इतर देशांनी धडा घेण्याची आवश्यकता असल्याचे पाओलो माउरो पुढे म्हणाले.

leave a reply