लडाखमधील सैन्य माघारीचा चीनचा दावा भारताने फेटाळला

China-Ladakhनवी दिल्ली – लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रे़षेवरील बहुतांश भागातून आपल्या जवानांनी माघार घेतली असून या क्षेत्रातील स्थिती सुधारीत असल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. तसेच भारतासोबत उर्वरीत मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आपला देश उत्सुक असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पण सैन्यमाघारीबाबत चीनने केलेला हा नवा दावा भारताने स्पष्ट शब्दात फेटाळला आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेंबिन यांनी मंगळवारी माध्यमांसमोर बोलताना चीनने भारताबरोबरच्या चर्चेतील मुद्द्यांचे पालन केल्याचा दावा केला. गलवान, गोग्रा आणि हॉट स्प्रिंग या ठिकाणाहून चीनच्या लष्कराने माघार घेतल्याचे वेंबिन यांनी सांगितले. त्याचबरोबर सदर भागातील परिस्थिती सुधारीत असल्याचे सांगून भारताने देखील चीनच्या मुद्द्यांचा विचार करावा. तसेच चीनबरोबरच्या सीमाभागात शांती व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सहाय्य करावे, असे सांगून चीनने आपली जबाबदारी पार पाडल्याचा अजब दावा वेंबिन यांनी केला. पण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत बोलताना पँगाँग त्सो, डेप्साँग जवळच्या भागातील चीनच्या लष्करी हालचालीबाबतच्या प्रश्नांना बगल देणे चीनने कायम ठेवले आहे.

China-Ladakhचीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सैन्यमाघारीबाबत केलेला दावा भारताने फेटाळला. वेंबिन यांनी सैन्यमाघारी विषयी केलेले विधान पूर्णपणे बरोबर नसल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील माघारीबाबत चीन करीत असलेल्या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर सैन्यमाघारीची खातरजमा झाल्याशिवाय कुठलेही दावे स्वीकारणार नसल्याचे भारताने आधीच स्पष्ट केले होते. चीन कितीही दावे करीत असला तरी, पँगाँग त्सो, डेप्साँगच्या काही भागात चीनचे लष्कर अजूनही तैनात असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. चीनच्या ताब्यातील तिबेटच्या सीमेजवळ चीनने मोठ्या प्रमाणात लष्कराची जमवाजमव केल्याचे दावे केले जात आहेत.

दरम्यान, गलवानमध्ये मर्यादित संघर्ष छेडून पुढे आपल्या अटींवर भारताला माघार घेण्यास भाग पाडण्याचा चीनचा हेतू होता. पण भारतीय सैनिकांनी गलवानच्या संघर्षात चीनचे सारे डाव हाणून पाडले. पुढे आर्थिक स्तरावर भारताने दिलेले प्रत्युत्तर चीनच्या चांगलेच अंगलट आले आहे. डिजिटल स्ट्राईक, चीनची गुंतवणूक तसेच चिनी उत्पाद्नांवरील भारताची बंदी चीनला जबर आर्थिक नुकसान देणारी ठरली आहे.

leave a reply