भारत व रशियाची मैत्री काळाच्या कसोटीवर सिद्ध झाली

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

नवी दिल्ली – गेल्या काही दशकांमध्ये फार मोठ्या उलथापालथी होऊनही, भारत व रशियाच्या मैत्रीवर त्याचा प्रभाव पडलेला नाही. आजही दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण सहकार्य अबाधित आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौर्‍यावर आलेल्या रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे स्वागत केले. तर भारत महान शक्ती असलेला देश आहे व भारताची रशियाबरोबरील मैत्री काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली आहे, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले. दुसर्‍या कुठल्याही देशाबरोबर केले नाही, असे लष्करी व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्य भारत रशियाबरोबर करीत आहे, असे आश्‍वासक उद्गार यावेळी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी काढले.

भारत व रशियाची मैत्री काळाच्या कसोटीवर सिद्ध झाली - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनराष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या या भारतभेटीकडे जगभरातील निरिक्षकांची नजर लागली होती. आपल्या एका दिवसाच्या या दौर्‍यात रशियन राष्ट्राध्यक्ष भारताबरोबर महत्त्वपूर्ण करार करणार असल्याचे आधीच उघड झाले होते. त्यानुसार दोन्ही देशांमध्ये सुमारे २८ करार संपन्न झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रिंगला यांनी दिली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची ही भारतभेट अतिशय फलदायी ठरल्याचा दावा श्रिंगला यांनी केला आहे. भारताचे चीनबरोबरील व रशियाचे अमेरिकेबरोबरील संबंध ताणलेले असताना, उभय देशांमधील सहकार्याला फार मोठे सामरिक महत्त्व आले आहे. अफगाणिस्तानचा ताबा तालिबानकडे आल्यानंतर भारत व रशियाच्याही सुरक्षेला फार मोठा धोका संभवतो. त्यामुळे अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर भारत व रशियाचे सहकार्य निर्णायक बाब ठरू शकते. उभय नेत्यांमधील चर्चेत अफगाणिस्तानचा मुद्दा ऐरणीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अफगाणिस्तानचा वापर दहशतवादासाठी होऊ नये, यावर भारत व रशिया ठाम आहेत. अफगाणिस्तानसह इतर क्षेत्रिय मुद्यांवर आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबरोबरील संयुक्त निवेदनात स्पष्ट केले. तसेच कोरोनाच्या काळातही दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य केले, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. तसेच पुढच्या काळात रशियाच्या अतिपूर्वेकडील भाग व भारताच्या राज्यांमधील सहकार्य आता प्रत्यक्षात उतरू लागल्याचे सांगून पंतप्रधानांनी त्यावर समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांमधले व्यापारी सहकार्य २०२५ सालापर्यंत ३० अब्ज डॉलर्सवर नेण्याचे ध्येय उभय देशांनी ठेवले आहे. त्याचवेळी गुंतवणुकीच्या क्षेत्रातील सहकार्य ५० अब्ज डॉलर्सवर नेण्याची तयारी दोन्ही देशांनी केलेली आहे.

दरम्यान, पुतिन यांच्या या भेटीतच भारत व रशियामध्ये पहिली ‘टू प्लस टू’ चर्चा सुरू झाली. यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी थेट नामोल्लेख न करता चीनच्या आक्रमक लष्करी हालचालींना लक्ष्य केले. कारण नसताना भारताला उत्तरेकडील सीमेवरील आव्हानाचा सामना करावा लागत आहे, असे राजनाथ सिंग म्हणाले. मात्र आपली प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि भारतीयांकडे असलेली जबरदस्त क्षमता याच्या बळावर भारत या आव्हानांवर मात करील, असा विश्‍वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची ही भारतभेट व दोन्ही देशांमधील ही टू प्लस टू चर्चा म्हणजे रशियाने चीनला दिलेला इशारा असल्याचे दावे काही विश्‍लेषक करीत आहेत. म्हणूनच चीन यामुळे अस्वस्थ बनल्याचे संकेत मिळत असून पाकिस्तान देखील भारत व रशियाच्या सहकार्याकडे संशयाने पाहत आहे. अमेरिकेशी सहकार्य करूनही भारत रशियाबरोबरील मैत्री कायम राखत आहे, हे भारताच्या परराष्ट्र धोरणाला मिळालेले मोठे यश ठरते, असा दावा पाकिस्तानचे पत्रकार करीत आहेत. यामुळे अफगाणिस्तानातील घडामोडींचा फायदा घेऊन रशियाबरोबरील जवळीक वाढविण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना धक्के बसल्याचे दावेही करण्यात येत आहेत.

leave a reply