कच्च्या तेलाच्या साठवणुकीमुळे भारताची पाच हजार कोटी रुपयांची बचत   

नवी दिल्ली – एप्रिल, मे महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरलेल्या इंधनतेलाचा लाभ उचलून भारताने इंधन ‘स्ट्रॅटेजिक’ तेल साठवणूक टाक्या भरुन ठेवल्या होत्या. यामुळे भारताची पाच हजार कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. राज्यसभेत लेखी उत्तर देताना ते बोलत होते.

जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६० डॉलर्स इतके होते. कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे एप्रिल- मे महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात घसरण होऊन ते प्रति बॅरल १९ डॉलर्सवर आले. याचा इंधनाची मोठ्या प्रमाणावर आयात करणाऱ्या भारताने लाभ उचलला. भारताने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि इराकमधून १.६७ कोटी बॅरल्स कच्चे तेल खरेदी केले.

भारताने जवळपास ५३ लाख टन इतके कच्चे तेल विशाखापट्टणम्, मंगळुरु आणि आंध्रप्रदेशमधील पाडुरमध्ये भूमिगत इंधनटाक्यांमध्ये साठवून ठेवले. संकटाच्या काळात भारताला हे फायदेशीर ठरेल, असे प्रधान म्हणाले. इंधनदराच्या घसरणीच्या काळात कच्चे तेल खरेदी केल्यामुळे भारताची पाच हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचे सांगून प्रधान यांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

दरम्यान, ८७ दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाची साठवणूक झाल्याचे सांगितले जाते. ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’च्या सदस्य देशांसाठी ९० दिवस पुरेल इतके कच्चे तेल साठवायचे असा मानक आहे. भारत त्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

leave a reply