संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताची क्षमता सिद्ध झाली

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

गांधीनगर – हा देश आता शांततेची कबुतरे उडविणारा देश राहिला नसून आत्ताचा भारत चित्त्यांना मोकळे करीत आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या मानसिकतेत झालेला आक्रमक बदल अधोरेखित केला. गुजरातच्या गांधीनगरमधील ‘डिफेन्स एक्स्पो 2022’मध्ये पंतप्रधान बोलत होते. देशाच्या संरक्षणदलांकडून आता देशातच तयार झालेल्या शस्त्रास्त्रांची व संरक्षणसाहित्याची खरेदी केली जाते, ही बाब आत्मनिर्भर भारताची क्षमता सिद्ध करणारी ठरते, असे सांगून पंतप्रधानांनी त्यावर समाधान व्यक्त केले. तसेच भारताची संरक्षणविषयक निर्यात पुढच्या काळात प्रचंड प्रमाणात वाढणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातच्या बनासकांठा येथील डीसा येथील हवाई तळाच्या पायाभरणीचा समारोह पार पडला. पाकिस्तानच्या सीमेजवळील हा तळ देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘डिफेन्स एक्स्पो 2022’मध्ये संरक्षणक्षेत्रातील देशी कंपन्यांचा सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरतो. यात केवळ भारतीय कंपन्या सहभागी झाल्या असून यात मेड इन इंडिया उपकरणे प्रदर्शित करण्यात येत आहेत. अशारितीने देशात आयोजित करण्यात आलेला हा पहिला डिफेन्स एक्स्पो ठरतो, असे सांगून पंतप्रधानांनी या प्रदर्शनाचे महत्त्व स्पष्ट केले. भारतीय संरक्षणदलांकडून आत्ताच्या काळात देशात तयार झालेले संरक्षणविषयक साहित्य वापरले जाते, हे आत्मनिर्भर भारत योजनेला मिळालेले फार मोठे यश ठरते. यामुळे आत्मनिर्भर भारताची क्षमता सिद्ध झालेली आहे, असा दावा पंतप्रधानांनी केला.

2021-22 या वित्तीय वर्षात देशाने 13 हजार कोटी रुपयांची संरक्षणविषयक निर्यात केली. पण पुढच्या काळात ही निर्यात 40 हजार कोटी रुपयांवर नेण्याचे ध्येय सरकारने समोर ठेवले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. भारतीय संरक्षणदलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. यामुळे भारताच्या संरक्षणविषयक तंत्रज्ञानावरील जगाचा विश्वास अधिकच वाढला आहे. देशी बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका नौदलात सहभागी झाली आहे. तसेच कमी वजनाचे लढाऊ हेलिकॉप्टर एलसीएच प्रचंड देखील लष्कराच्या ताफ्यात आले आहे. भारताच्या संरक्षणविषयक क्षमतेत झालेली वाढ यातून स्पष्ट होते, असे पंतप्रधान म्हणाले.

आत्ताच्या काळात पश्चिमेकडून सीमेवरून केल्या जाणाऱ्या दुःस्साहसाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असे सांगून पंतप्रधानांनी थेट नामोल्लेख न करता पाकिस्तानला इशारा दिला. उत्तर गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसा येथे वायुसेनेच्या तळाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. हा तळ देशाच्या संरक्षणात फार मोठे योगदान देणारा ठरेल, असे सूचक उद्गार यावेळी पंतप्रधानांनी काढले. पारंपरिक संरक्षणाबरोबरच अंतराळ क्षेत्रातील संरक्षणाचे महत्त्व वाढले असून ‘मिशन डिफेन्स स्पेस’ला केंद्र सरकारकडून विशेष प्रोत्साहन दिले जात आहे, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. अवकाश क्षेत्रातील भारत 60हून अधिक देशांशी सहकार्य करीत आहे. भारत लवकरच दक्षिण आशियाई देशांसाठी स्वतंत्र उपग्रह प्रक्षेपित करील. दहा आशियाई देशांना याचा लाभ मिळेल, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. तसेच भारतीय उपग्रहांकडून मिळणाऱ्या डाटाचा वापर युरोपिय देशांकडूनही केला जात असल्याचे सांगून पंतप्रधानांनी ही देशासाठी गौरवास्पद बाब असल्याचे नमूद केले.

leave a reply