इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताने आपले सामर्थ्य प्रदर्शित करावे

- माजी नौदल अधिकाऱ्यांची मागणी

भारताने आपले सामर्थ्यचंदिगड – इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत भारताला केवळ राजनैतिक पातळीवर विचार करून चालणार नाही, तर राजनैतिक प्रयत्नांना सागरी क्षेत्रातील सामर्थ्याचीही जोड असणे अत्यावश्यक ठरते. विशेषतः विमानवाहू युद्धनौकांचा भारतीय नौदलात अधिक प्रमाणात समावेश असणे ही काळाची गरज आहे, असे व्हाईस ॲडमिरल (निवृत्त) गिरीश लुथ्रा यांनी बजावले. त्याचवेळी चीनच्या क्षेत्रिय व जागितक पातळीवरील महत्त्वाकांक्षामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असताना, भारतासाठी आपल्या नौदलाच्या सामर्थ्यात मोठ्या प्रमाणात वाढ करणे अनिवार्य बनल्याची जाणीव लुथ्रा यांनी करून दिली.

चंदिगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मिलिटरी लिट्रीचर फेस्टिव्हल’मध्ये ‘रेलेव्हन्स ऑफ एअरक्राफ्ट कॅरिअर्स इन पावर प्रोजेक्शन’ या विषयावर व्हाईस ॲडमिरल (निवृत्त) गिरीश लुथ्रा बोलत होते. भारतीय नौदलासाठी तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची ऑर्डर देण्यावर गंभीर चर्चा सुरू आहे. भारतीय नौदलात काही वर्षाने सहभागी होणारी तिसरी युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’प्रमाणे ४५ हजार टन वजनाची असावी, की भारताने ६५ हजार टन वजनाची महाकाय विमानवाहू युद्धनौका उभारावी, यावर विचारविनिमय सुरू आहे.

नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार यांनी शनिवारी याची माहिती दिली. आयएनएस विक्रांतची उभारणी करणाऱ्या विशाखापट्टणम्‌‍ शिपयार्डने विक्रांतसारखी ४५ हजार टनाची विमानवाहू युद्धनौका उभारण्याची ऑर्डर मिळाल्यास, चार वर्षातच हे काम पूर्ण होईल, असा प्रस्ताव दिला होता.

यावर चर्चा सुरू असतानाच, माजी नौदल अधिकारी गिरीश लुथ्रा यांनी विमानवाहू युद्धनौकेची आवश्यकता नेमक्या शब्दात मांडली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपले हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी भारताला केवळ राजनैतिक पातळीवर प्रयत्न करून चालणार नाही, त्याला सागरी क्षेत्रातील सामर्थ्याची जोड असलीच पाहिजे, असा दावा लुथ्रा यांनी केला. जगाच्या ‘जीडीपी’मध्ये ६० टक्के इतक्या प्रमाणात जीडीपीचा हिस्सा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांचा आहे. जगाच्या विकासापैकी ६६ टक्के इतका आर्थिक विकास आणि ७० टक्के जागतिक व्यापारी मालवाहतूक इंडो पॅसिफिक क्षेत्रातून होते. त्यामुळे या क्षेत्राला जबरदस्त महत्त्व आले आहे. म्हणूनच महत्त्वाचे देश इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत आपले धोरण आखत आहेत, याकडे लुथ्रा यांनी लक्ष वेधले.

leave a reply