२०२३-२४च्या वित्तीय वर्षात भारत सर्वाधिक विकासदराने प्रगती करील

जागतिक बँक व एशियन डेव्हलपमेंट बँकेचा विश्वास

नवी दिल्ली – २०२३-२४च्या वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ६.३ टक्के इतक्या विकासदराने प्रगती करील, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. याआधी जागतिक बँकेने या वित्तीय वर्षात भारताचा विकासदर ६.६ टक्के इतका असेल, असा दावा केला होता. पण जागतिक पातळीवरील उलथापालथी व अंतर्गत पातळीवरील खपत कमी होईल, असे सांगून जागतिक बँकेने भारताचा या वित्तीय वर्षातील विकासदर ०.३ ने घटण्याचा अंदाज वर्तविला आहे. असे असले तरी भारत हाच सर्वाधिक विकासदराने प्रगती करणारा देश असेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेने देखील भारतीय अर्थव्यवस्थेकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरील उलथापालथींचा सामना करण्याची क्षमता असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

World Bankगेल्या वर्षी जागतिक बँकेने २०२३-२४ या वित्तीय वर्षात भारताचा विकासदर ६.६ टक्के इतका असेल, असा दावा केला होता. पण भारतीय अर्थव्यवस्था बाह्य व अंतर्गत कारणांमुळे ६.३ टक्के इतक्या विकासदराने या वर्षात पुढे जाईल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. तर एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारताचा विकासदर २०२३-२४मध्ये ६.४ टक्के इतका असेल, असे म्हटले आहे. विकासदराच्या अंदाजात कपात केली असली, तरी भारत हाच सर्वाधिक विकासदर असलेला देश असेल, असा विश्वास जागतिक बँक तसेच एशियन डेव्हलपमेंट बँकेने व्यक्त केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील उलथापालथींचा सामना करण्याची व त्या स्थितीतही उत्तम विकासदर राखण्याची क्षमता भारताकडे आहे, असा विश्वास जागतिक बँक व एशियन डेव्हलपमेंट बँकेनेही व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम अर्थतज्ज्ञ व विश्लेषक देखील आर्थिक मंदीचे मळभ दाटून आलेले असताना देखील भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करून दाखविल, असा विश्वास व्यक्त करीत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी देखील अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करून दाखविल, अशी ग्वाही दिली होती. या पार्श्वभूमीवर, भारतातील अंतर्गत मागणी हा विकासाचा प्रमुख अधार असेल व त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक घडामोडींना भारत अधिक चांगल्यारितीने तोंड देऊ शकतो, असा निष्कर्ष एशियन डेव्हलपमेंट बँकेने नोंदविलेला आहे.

तर सशक्त अर्थव्यवस्थेमुळे २०२४-२५च्या वित्तीय वर्षात भारतात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येईल, असा दावा एशियन डेव्हलपमेंट बँकेने केला आहे.

हिंदी

leave a reply