भारत, युएई व अमेरिकेच्या सौदीबरोबरील चर्चेमुळे चीन धास्तावला

नवी दिल्ली/दुबई – भारत, युएई व अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची सौदीचे क्राऊन प्रिन्स व पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा पार पडली. आखाती क्षेत्रात रेल्वेसेवा सुरू करून ती बंदरांना जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर हे चारही देश काम करणार आहेत. या प्रकल्पात रेल्वेसेवेच्या उभारणीचा अनुभव असलेल्या भारताला विशेष महत्त्व दिले जाईल. उघडपणे कुणीही जाहीर केलेले नसले तरी भारत, युएई, सौदी व अमेरिका हा प्रकल्प चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह-बीआरआय’ला पर्याय देण्यासाठी राबवित असल्याचे संकेत मिळत आहेत. यावर चीनमधून प्रतिक्रियाही आली आहे.

भारत, युएई व अमेरिकेच्या सौदीबरोबरील चर्चेमुळे चीन धास्तावलासौदी अरेबिया व इराण या देशांमध्ये मध्यस्थी घडवून आणणाऱ्या चीनचा आखाती क्षेत्रातील प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दावे केले जातात. आखाती क्षेत्राबाबत अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने राबविलेल्या बेताल धोरणांमुळेच चीनला तशी संधी मिळाल्याचे आरोप अमेरिकेचे विरोधी पक्षनेते व सामरिक विश्लेषक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने आखातातील आपला प्रभाव वाढविण्यासाठी नव्याने हालचाली सुरू केल्याचे दिसते. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी सौदीचा दौरा करून क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. भारत व युएईच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसेच सौदीच्या क्राऊन प्रिन्सबरोबरील चर्चेत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी आखाती क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासप्रकल्पांचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले जाते.

यामध्ये आखाती क्षेत्र रेल्वेसेवेने जोडण्याची योजना असून यासाठी भारताचे सहाय्य घेतले जाईल. ही रेल्वेसेवा बंदरांना जोडली जाईल व याद्वारे आखाती देशांची भारताशी मालवाहतूक करण्यात येईल. त्यामुळे भारतासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरतो. रविवारी झालेल्या या चर्चेची दखल जगभरातील माध्यमांनी घेतली आहे. चीनचा आखातातील वाढलेला प्रभाव कमी करण्यासाठी व चीनच्या ‘बीआरआय’ प्रकल्पाला काटशह देण्यासाठी भारत, अमेरिका, युएई व सौदी एकत्र आल्याचा दावा या माध्यमांनी केला आहे. याआधी भारत, इस्रायल, अमेरिका व युएई यांचा ‘आयटूयुटू’ हा गट स्थापन झाला होता. आखाती क्षेत्रातील चीनचा प्रभाव कमी करण्याच्या हेतूने हा गट तयार करण्यात आल्याचे दावे केले जात होते. काहीजणांनी याला आखाती क्षेत्रातील क्वाड असे नाव दिले होते.

रविवारी पार पडलेल्या चर्चेची दखल चीनने घेतल्याचे दिसत आहे. अमेरिकेने आखाती क्षेत्रात रेल्वेसेवेसाठी घेतलेला पुढाकार म्हणजे ‘कॉपीकॅट’ असल्याची टीका चीनचे शु लियांग या चिनी विश्लेषकाने केली आहे. अमेरिकेने आखाती क्षेत्रासाठी घेतलेला हा पुढाकार म्हणजे शीतयुद्धाच्या काळातील मानसिकतेचा भाग असल्याची टीका लियांग यांनी केली. तर चीनचा बीआरआय प्रकल्प यापेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचा दावा लियांग यांनी केला आहे. सौदी व इराणमध्ये चीनने यशस्वी मध्यस्थी घडवून आणल्यानंतर, अमेरिका खडबडून जागी झाली आणि आखाती क्षेत्रात रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी चर्चा करीत आहे, अशी टीका वेन जिंग या चिनी अभ्यासकाने केली.

क्वाड, ऑकस, आयटूयुटू हे सारे अमेरिकेने चीनला रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा भाग असल्याचा टोला देखील वेन जिंग यांनी लगावला.

हिंदी English

 

leave a reply