भारत अफगाणी जनतेसोबत असेल

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची ग्वाही

परराष्ट्रमंत्रीनवी दिल्ली – अफगाणिस्तानची जनता अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करीत असताना, भारत आधीप्रमाणे यावेळीही अफगाणी जनतेला साथ देईल, अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अफगाणिस्तानविषयक परिषदेला संबोधित करताना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अफगाणी जनतेला सहाय्य करण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. त्याचवेळी अफगाणिस्तानात सहाय्य घेऊन जाण्यासाठी व या देशाबाहेर येण्यासाठी सुरक्षित मार्ग लवकरात लवकर तयार करणे अत्यावश्यक आहे, याकडे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्ष वेधले.

संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केलेल्या या व्हर्च्युअल परिषदेत बोलताना जयशंकर यांनी अफगाणिस्तानबाबतची भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली. भारताने अफगाणिस्तानात अश्रफ गनी यांच्या सरकारबरोबरील सहकार्याला सर्वाधिक महत्त्व दिले. त्यामुळे तालिबानच्या हाती सत्ता आल्यानंतर भारताचे अफगाणिस्तानातील महत्त्व कमी झाल्याची टीका काहीजणांकडून केली जात आहे. या टीकाकारांमध्ये पाकिस्तानचे विश्‍लेषक आघाडीवर आहे. पण भारताची अफगाणिस्तानबाबतची भूमिका ही अफगाणी जनतेच्या बाजूने उभा राहण्याचीच आहे, असे भारत सरकार ठासून सांगत आहे. परराष्ट्र जयशंकर यांनी या व्हर्च्युअल परिषदेत पुन्हा एकदा भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली.

भारत व अफगाणी जनतेचे ऐतिहासिक काळापासून मैत्रीपूर्ण संबंध होते. आत्ताच्या काळात अफगाणिस्तानात फार मोठ्या राजकीय, आर्थिक, सामाजिक व सुरक्षाविषयक उलथापालथी होत असताना देखील भारत अफगाणी जनतेची साथ सोडणार नाही. भारत नेहमी अफगाणींना आवश्यक ते मानवतावादी सहाय्य पुरवित राहिल, अशी ग्वाही परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. तसेच इतर देशांनीही अफगाणी जनतेला सहकार्य करावे, अशी अपेक्षा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी व्यक्त केली.

एखाद्या देशाने अफगाणी जनतेला सहाय्य करण्यापेक्षा बहुपक्षीय सहाय्य करणे अधिक श्रेयस्कर ठरेल, असे यावेळी जयशंकर यांनी सुचविले. मात्र अफगाणिस्तानातील अस्थैर्य व असुरक्षिततेचे अडथळे पार करण्यासाठी प्रयत्न व्हावे. अफगाणिस्तानात मानवतावादी सहाय्य घेऊन जाणे व या देशातून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार झाल्याखेरीज अफगाणी जनतेपर्यंत सहाय्य घेऊन जाता येणार नाही, याची जाणीव भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या परिषदेत करून दिली.

दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी काबुल तालिबानच्या हाती पडल्यानंतर, भारताचा अफगाणिस्तानवरील प्रभाव संपल्याचा दावा पाकिस्तानात केला जात होता. इतर देशांबरोबर भारतानेही अफगाणिस्तानातील आपले दूतावास बंद केल्याचा जल्लोष पाकिस्तानात साजरा झाला होता. पण अजूनही भारत अफगाणिस्तानवरील प्रभाव राखून असल्याची जाणीव पाकिस्तानला होऊ लागली आहे. इतकेच नाही तर अफगाणिस्तानबाबत चर्चेसाठी अमेरिका, रशिया, ब्रिटन या देशांच्या गुप्तचर व सुरक्षा यंत्रणोचे प्रमुख भारताला भेट देत आहेत, यामुळे पाकिस्तानात चलबिचल सुरू झाली आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या अफगाणिस्तानातील हस्तक्षेपाविरोधात अफगाणी जनता रस्त्यावर उतरली असून पाकिस्तानच्या निषेधाचे सूर अफगाणी शहरांमध्ये गाजत आहेत. पाश्‍चिमात्य देशांचे नेते व वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानवर निर्बंध लादण्याची मागणी करू लागले आहेत. यामुळे अफगाणिस्तानातील आपल्या देशाचा ‘गेम’ उलटला की काय, अशी चिंता पाकिस्तानी विश्‍लेषकांना भेडसावू लागली आहे.

अशा परिस्थितीत भारताने आपण अफगाणी जनतेसोबत असल्याचे पुन्हा एकदा जाहीर करून अफगाणी जनतेला दिलेला दिलासा, पाकिस्तानात अस्वस्थता माजविणारा ठरू शकतो.

leave a reply