२१ व्या शतकाला आकार देण्यात भारताची निर्णायक भूमिका असेल

जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

नवी दिल्ली – जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ॲनालेना बेअरबॉक भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांच्याबरोबरील संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताला चिथावणी देणारी विधाने केली होती. संयुक्त राष्ट्रसंघाने हस्तक्षेप करून काश्मीरचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यावेळी परराष्ट्रमंत्री बेअरबॉक यांनी केल्यानंतर भारतातून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र आपल्या भारत दौऱ्याच्या आधी बेअरबॉक यांनी ही चूक दुरूस्त केली असून काश्मीर हा भारत व पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्न असल्याचा दावा केला. तर जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करताना, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानने सीमेपलिकडून दहशतवादाची निर्यात थांबविल्याखेरीज भारत या देशाशी चर्चा करणार नाही, असे स्पष्ट केले.

21st centuryपरराष्ट्रमंत्री ॲनालेना बेअरबॉक यांच्या या भारतभेटीत दोन्ही देशांमध्ये ‘मोबिलिटी पार्टनरशिप’ करार संपन्न झाला आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना परस्परांच्या देशात अभ्यास, संशोधन व काम करणे अधिक सोपे जाईल, असा दावा केला जातो. ‘जर्मनीला भारताबरोबर धोरणात्मक सहकार्य विकसित करायचे आहेच. पण त्याच्याही पलिकडे जाऊन जर्मनी भारताबरोबर आर्थिक, हवामान बदल आणि सुरक्षाविषयक धोरणाबाबतचे सहकार्य प्रस्थापित करायचे आहे. हे पोकळ शब्द नाहीत. भारत हा जर्मनीचा विश्वासार्ह भागीदार देश ठरतो, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री ॲनालेना बेअरबॉक यांनी भारताबरोबरील जर्मनीच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

याबरोबरच भारताने गेल्या १५ वर्षात ४० कोटीहून अधिक जनतेला अतीव गरीबीतून बाहेर काढले आहे. ही जनसंख्या जवळपास युरोपिय महासंघाच्या जनसंख्येइतकी आहे, असे सांगून जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताची प्रशंसा केली. तसेच २१ व्या शतकाला आकार देण्यात भारताची निर्णायक भूमिका असेल, याबाबत आपल्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही, असे परराष्ट्रमंत्री ॲनालेना बेअरबॉक पुढे म्हणाल्या. तसेच नुकत्याच पार पडलेल्या बाली येथील जी२० परिषदेत भारत आपण या संघटनेचे नेतृत्त्व करण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिल्याचे सांगून बेअरबॉक यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. उभरती आर्थिक शक्ती आणि सशक्त लोकशाही असलेला भारत अनेक देशांसाठी आदर्श असून देशांना जोडणाऱ्या पुलाचे कार्य करील, असा विश्वासही जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात परराष्ट्रमंत्री बेअरबॉक यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांच्याबरोबरील जर्मनीतील पत्रकार परिषदेत काश्मीरबाबत केलेल्या विधानांचा प्रभाव त्यांच्या भारतभेटीतही पहायला मिळाला. या दौऱ्याच्या आधी बेअरबॉक यांनी काश्मीर हा भारत व पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगून याबाबतची जर्मनीची आधीचीच भूमिका कायम असल्याचा निर्वाळा दिला. पण त्यांच्याबरोबरील चर्चेत अफगाणिस्तान व पाकिस्तानचा विषय ऐरणीवर होता, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. जोवर पाकिस्तान सीमेपलिकडून भारतात दहशतवादाची निर्यात थांबवित नाही, तोपर्यंत भारत पाकिस्तानशी चर्चा करणार नाही, ही भूमिका परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ठासून मांडली. जर्मनीने भारताच्या या भूमिकेला प्रतिसाद दिल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, युक्रेनचे युद्ध व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडींवरही भारत व जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा पार पडली. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याबरोबरील संयुक्त पत्रकार परिषदेत बेअरबॉक यांना चीनबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीन हा जर्मनीचा स्पर्धक देश असल्याचे सांगून काही क्षेत्रात चीन प्रतिस्पर्धी म्हणून समोर येत असल्याचे मान्य केले. चीनपासून संभवणाऱ्या धोक्याला जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेला दुजोरा लक्षवेधी बाब ठरते.

leave a reply