भारताचे लष्करप्रमुख सौदी व युएईच्या दौऱ्यावर

रियाध – भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. या दोन्ही देशांचे पाकिस्तानबरोबरील संबंध ताणलेले असताना, लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या या दौऱ्याला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशारितीने भारताचे लष्करप्रमुख पहिल्यांदाच सौदी व युएईच्या भेटीवर असून त्यांचा हा दौरा ऐतिहासिक ठरतो, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. आखाती क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, सौदी व युएईने भारताबरोबर धोरणात्मक सहकार्य व्यापक करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे प्रतिबिंब जनरल नरवणे यांच्या या दौऱ्यात पडल्याचे दिसू लागले आहे.

आपल्या चार दिवसांच्या या दौऱ्यात जनरल नरवणे सौदी अरेबियाला भेट देतील. सौदीच्या लष्करी तसेच राजकीय नेतृत्त्वाबरोबर जनरल नरवणे यांची चर्चा होणार आहे. तसेच सौदीच्या लष्करी आस्थापनांना व नॅशनल डिफेन्स कॉलेजलाही जनरल नरवणे भेट देतील. त्यानंतर लष्करप्रमुख जनरल नरवणे युएईचा दौरा करणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सौदी व युएईचे पाकिस्तानबरोबरील संबंध ताणलेले आहेत. ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओआयसी) या सौदीच्या प्रभावाखाली असलेल्या संघटनेकडून काश्‍मीर प्रश्‍नावर योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार पाकिस्तानने केली होती. ही संघटना भारताचा निषेध नोंदवित नाही, असा ठपका ठेवून पाकिस्तानने सौदी अरेबियाला लक्ष्य केले होते.

सौदी तसेच युएईकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. या दोन्ही देशांनी पाकिस्तानला दिलेले अब्जावधी डॉलर्सच्या कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा सुरू केला होता. तसेच सौदी व युएईमध्ये मिळून सुमारे 25 लाखाहून अधिक पाकिस्तानी कामगार कार्यरत आहेत. यातील बहुसंख्य कामगारांच्या हकालपट्टीची तयारी या दोन्ही देशांनी केल्याची चिंता पाकिस्तानी विश्‍लेषक व्यक्त करू लागले आहेत. याने धाबे दणाणलेल्या पाकिस्तानने सौदीची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले व याकरीता पाकिस्तानचे लष्करप्रमुख सौदीच्या भेटीवरही गेले होते. मात्र सौदीवर त्याचा विशेष प्रभाव पडला नव्हता.

या पार्श्‍वभूमीवर, भारत आणि सौदी तसेच युएईचे संबंध अधिकच दृढ बनत चालले आहेत. भारताकडून केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत सौदी अरेबियाचा हिस्सा 17 टक्के इतका आहे. तसेच भारतात होणाऱ्या एलपीजी गॅसच्या आयातीमधील सौदीची हिस्सेदारी 32 टक्के इतकी आहे. याबरोबरच सौदी भारताच्या पेट्रोकेमिकल्स तसेच इतर क्षेत्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. सौदी इंधनाच्या निर्यातीवरील आपल्या अर्थव्यवस्थेचे अवलंबित्त्व कमी करण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच फार मोठी बाजारपेठ असलेल्या भारताबरोबरील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरेल, याची जाणीवही सौदी अरेबियाला झालेली आहे. मुख्य म्हणजे सामरिक पातळीवरील भारताचे सहकार्य आखाती क्षेत्रात स्थैर्य राखण्यासाठी महत्त्वाचे ठरेल, ही बाब सौदी व युएईला पटलेली असून यासाठीच दोन्ही देश भारताला विशेष महत्त्व देत आहेत.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे इराणविरोधी धोरण बदलून इराणबाबत उदार भूमिका स्वीकारण्याचे संकेत देणारे ज्यो बायडेन लवकरच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर येणार आहेत. यामुळेच सौदी, युएई या देशांनी इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करून इराणला रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताबरोबरील आपले धोरणात्मक सहकार्य सौदी व युएईसाठी फार मोठी जमेची बाजू ठरू शकते, हे सौदी व युएईच्या ध्यानी आले आहे. त्यामुळे भारत व सौदी तसेच युएईमध्ये लष्करी पातळीवरील सहकार्य वेग घेईल, असा दावा काही सामरिक विश्‍लेषक करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, जनरल नरवणे यांची सौदी अरेबिया व युएईचा दौरा जगभरातील विश्‍लेषकांचे लक्ष वेधून घेत आहे. तर भारताने आपले पारंपरिक मित्रदेश खेचून घेतले आणि त्यांना पाकिस्तानचे शत्रू बनविले, असा ओरडा पाकिस्तानी विश्‍लेषकांनी सुरू केला आहे.

leave a reply