अमेरिका, युरोप, जपान व चीन मंदीच्या भोवऱ्यात सापडले तरी भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीचा धोका नाही

- नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार

मंदीचा धोकानवी दिल्ली – अमेरिका, युरोपिय देश, जपान आणि चीनला देखील आर्थिक मंदीचा फटका बसेल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारताच्या विकासदरावरही याचा थोडाफार परिणाम होईल. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीचा धोका संभवत नाही. जगभरात मंदी आली तरी भारतीय अर्थव्यवस्था 2023-24 च्या वित्तीय वर्षात 6 ते 7 टक्के इतक्या विकासदराने प्रगती करील, असा विश्वास नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे. याबरोबरच देशाने निर्यातीत वाढ करण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता असल्याचे राजीव कुमार यांन पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

कोरोनाची साथ व त्यानंतर पेटलेले युक्रेनचे युद्ध यांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन आणि फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरेम पॉवेल यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसू शकेल, अशी कबुली दिली. युरोपातील भक्कम अर्थव्यवस्था असलेल्या देशांची आर्थिक स्थिती देखील बिकट बनली असून हे देश मंदीच्या तडाख्यातून वाचण्यासाठी धडपड करीत आहेत. जपानसमोर देखील फार मोठ्या आर्थिक समस्या खड्या ठाकल्या असून चीनच्या अर्थव्यवस्थेतील पडझडींचा धक्का साऱ्या जगाला बसू शकतो, असे दावे केले जातात. अशारितीने जगभरातील सर्वच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्था मंदीच्या छायेत येत असताना, भारताला मात्र हा धोका संभवत नाही, असे आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था व अर्थतज्ज्ञ आत्मविश्वासाने सांगत आहेत. नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी देखील ही ग्वाही दिली.

जागतिक बँकेने 2022-23च्या वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के इतक्या विकासदराने प्रगती करील, असा निष्कर्ष नोंदविला आहे. आधी वर्तविलेल्या निष्कर्षापेक्षा हा विकासदर एक टक्क्याने कमी आहे. जागतिक पातळीवरील मंदीचा थोडाफार प्रभाव भारतावर जरूर पडेल, मात्र अमेरिका, युरोपिय देश, जपान व चीनसारख्या देशांना भेडसावणारे आर्थिक मंदीचे संकट भारताला ग्रासणार नाही. 2023-24च्या आर्थिक वर्षात भारत 6 ते 7 टक्के इतक्या विकासदराने प्रगती करील, असा विश्वास राजीव कुमार यांनी व्यक्त केला. तसेच भारतातील महागाई देखील या काळात नियंत्रणात राहिल. मात्र इंधनतेलाचे दर व पुरवठा यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील, याची जाणीव राजीव कुमार यांनी करून दिली.

जगभरातील इतर प्रमुख देशांच्या चलनांबरोबरच भारताच्या रुपयाचीही अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरण झालेली आहे. मात्र सर्वसामान्य जनता सहसा इंर्पोटेड वस्तू वापरत नाही, त्यामुळे त्यांच्यावर याचा फार मोठा परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे राजीव कुमार म्हणाले. तसेच रुपयाचे मुल्य वाढण्यापेक्षा, रुपया आपल्या वास्तविक मुल्याच्या जवळ राहिलेला बरा, यामुळे मोठ्या घसरणीची शक्यता कमी होते, असा दावा नीति आयोगाच्या उपाध्यक्षांनी केला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करीत असताना, राजीव कुमार यांनी देशाने निर्यातीकडे अधिक लक्ष पुरविण्याचा सल्ला दिला.

निर्यात वाढविण्यासाठी व्यापक धोरण आखावे लागेल. मात्र एकच धोरण साऱ्या देशासाठी लागू करता येणार नाही. किनारपट्टी उपलब्ध नसलेले पंजाब राज्य आणि मोठी किनारपट्टी असलेल्या तामिळनाडूला व्यापार कसा करायचा पारंपरिक ज्ञान आहे. अशा राज्यांना निर्यातीसाठी एकच धोरण लागू करता येणार नाही, त्यांचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल, ही बाब नीति आयोगाच्या उपाध्यक्षांनी लक्षात आणून दिली आहे.

दरम्यान, जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चिता निर्माण झालेली असताना, भारत चमकता तारा म्हणून उदयाला येत असल्याचे केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात व्यापारमंत्र्यांनी हा दावा केला. कोरोनाची साथ ओसरल्यानंतरच्या आव्हानात्मक काळात देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी व्यवहार्य उपाययोजना सरकारने हाती घेतल्या होत्या. सर्वच समाजघटकांच्या कल्याणाचा विचार करून या योजना राबविण्यात आल्या आणि त्याचे परिणाम दिसत असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.

leave a reply