पुढच्या आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्था चमकदार कामगिरी करील

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्र्रिस्तिलिना जॉर्जिवा

वॉशिंग्टन – जागतिक अर्थकारणातील चमकता तारा असलेला भारत पुढच्या आर्थिक वर्षातही दमदार कामगिरी करून दाखविल. पुढच्या वर्षातील जागतिक आर्थिक विकासामधील एकट्या भारताचा हिस्सा तब्बल १५ टक्के इतका असेल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तिलिना जॉर्जिवा यांनी व्यक्त केला आहे. डिजिटायजेशनसाठी घेतलेला पुढाकार, शहाणपणाने आखलेले वित्तीय धोरण आणि मोठ्या प्रमाणात केलेली भांडवली गुंतवणूक, या साऱ्यांमुळे भारताची अर्थव्यवस्था पुढच्या आर्थिक वर्षातही दमदार कामगिरी करणार असल्याचा दावा जॉर्जिवा यांनी केला.

मार्च महिन्यात संपणाऱ्या २०२२-२३ च्या वित्तीय वर्षात भारताचा विकासदर ६.८ इतका असेल. पण २०२३-२४च्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ६.१ टक्क्यांवर येईल. जगभरातील इतर अर्थव्यवस्थांचा विकासदर मोठ्या प्रमाणात घसरत असताना, भारताच्या विकासदरातही घट होईल, यात वाद नाही. तरीही जागतिक अर्थव्यस्थेचा विचार केला, तर भारताचा ६.१ टक्के इतका विकासदर खूपच चांगला म्हणता येईल, असा दावा ख्रिस्तिलिना जॉर्जिवा यांनी केला. आर्थिक शिस्तीचे पालन व विकासाला चालना देण्यासाठी योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक, तसेच डिजिटायझेशनच्या प्रक्रियेला दिलेला वेग, यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत खूपच चांगली कामगिरी करून दाखवित असल्याचे जॉर्जिवा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

कोरोनाच्या साथीमध्ये मिळालेल्या धड्यातून भारताने योग्य तो बोध घेतला आणि त्यानुसार आपल्या धोरणात आवश्यक ते बदल केले. याचे सुपरिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसू लागले आहेत, असे जॉर्जिवा पुढे म्हणाल्या. आर्थिक स्थिती पाहून त्यानुसार निर्णय घेण्याच्या भारताच्या धोरणाची जॉर्जिवा यांनी प्रशंसा केली. २०२३-२४ सालासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचेही जॉर्जिवा यांनी कौतुक केले. या अर्थसंकल्पात भांडवली गुंतवणुकीमध्ये केलेली लक्षणीय वाढ उद्योगव्यवसाय व रोजगारांना चालना देणारी ठरेल, असा विश्वास नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जिवा यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ख्रिस्तिलिना जॉर्जिवा लवकरच भारताच्या भेटीवर येणार आहेत. जी-२० देशांची अर्थविषयक बैठक बंगळुरूमध्ये पार पडेल. यात सहभागी होण्यासाठी ख्रिस्तिना जॉर्जिवा भारताच्या भेटीवर येत असल्याचे सांगितले जाते. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली असून परिपक्व भारत आता जागतिक पातळीवरील आपली भूमिका पार पाडेल, असा दावा जॉर्जिवा यांनी या निमित्ताने केला. तसेच जी-२० परिषदेचे यजमानपद भूषविणाऱ्या भारताने सदर परिषदेसाठी ‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर’ अर्थात एकच वसुंधरा, एकच कुटुंब, एक भविष्य ही संकल्पना स्वीकारली आहे. ही संकल्पना आपल्या सर्वांना उभारी व चालना देणारी असल्याचे जॉर्जिवा यांनी म्हटले आहे.

leave a reply