सात वर्षात भारताची अर्थव्यवस्था सात ट्रिलियन डॉलर्सवर जाईल

- प्रमुख आर्थिक सल्लागार नागेस्वरन यांचा दावा

सात ट्रिलियन डॉलर्सवरकोलकता – 2022-23च्या वित्तीय वर्षात भारत तीन ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनत आहे. पुढच्या सात वर्षात भारतीय अर्थव्यवस्था तब्बल सात ट्रिलियन डॉलर्सवर जाईल, असा विश्वास देशाचे प्रमुख आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेस्वरन यांनी व्यक्त केला. ‘मर्चंट चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री-एमसीसीआय’च्या ‘इकॉनॉमिक फोरम’मध्ये बोलताना नागेस्वरन यांनी हा दावा केला आहे. 2025 सालात भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठेल, असे केंद्र सरकारने जाहीर केले होते. त्याच्या पलिकडे जाऊन प्रमुख आर्थिक सल्लागारांनी सात वर्षात भारतीय अर्थव्यवस्था दुपटीने वाढेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सध्या जगाला भेडसावत असलेल्या समस्यांचा दाखला आपल्या भाषणात नागेस्वरन यांनी दिला. 2023 सालाची सुरूवात झाली तरी युक्रेनचे युद्ध संपलेले नाही. यामुळे भू-राजकीय व आर्थिक स्तरावरील अनिश्चितता वाढत चालली आहे. तर कोरोनाच्या साथीमुळे स्वतःला निर्बंधांमध्ये जखडून घेणारा चीन आता खुला होऊ लागला असून चीनमधून येणारी इंधन व इतर वस्तूंची मागणी यामुळे वाढेल व त्याच्या दरावर याचा परिणाम होईल. त्याचबरोबर अमेरिका व युरोपच्या अर्थव्यवस्थांच्या विकासावरही याचे परिणाम होतील, असे नागेस्वरन यांनी म्हटले आहे.

अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था 2022-23चे वित्तीय वर्ष संपण्याआधी तीन ट्रिलियन डॉलर्सवर जात असून पुढच्या सात वर्षात भारतीय अर्थव्यवस्था तब्बल सात ट्रिलियन डॉलर्सवर जाऊ शकेल, असा दावा नागेस्वरन यांनी केला. दरम्यान, ब्रिटनस्थित ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च-सीईबीआर’ या अभ्यासगटाने डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात 2035 सालापर्यंत भारताची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन डॉलर्सवर जाईल असा निष्कर्ष नोंदविला होता. त्यामुळे केवळ भारतीय अर्थतज्ज्ञच नाही, तर परदेशी विश्लेषक देखील भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवित असल्याचे समोर येत आहे.

असे असले तरी, जागतिक अर्थव्यवस्थेत होणाऱ्या उलथापालथींचे परिणाम काही प्रमाणात भारतालाही सहन करावे लागतील, असे इशारे अर्थतज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत. जागतिक अर्थव्यवस्था यावर्षी मंदीच्या धोकादायकरित्या जवळ जाईल, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. अमेरिका, युरोपिय देश आणि चीन या सर्वांच्या अर्थव्यवस्थांचे कल नकारात्मक आहेत, याची जाणीव करून देऊन जागतिक बँकेने या वर्षी मंदीचा धोका अधिक बळावत असल्याचे संकेत दिले. जगावर मंदीचे संकट ओढावले, तर भारतीय अर्थव्यवस्थेलाही या संकटाचा सामना करावा लागेल, यामुळे भारताची निर्यात बाधित होईल, याकडे अर्थतज्ज्ञ लक्ष वेधत आहेत.

दरम्यान, विशाल जनसंख्येमुळे प्रचंड प्रमाणात होणारी खपत व जनसंख्येमध्ये असलेला तरुणवर्गाचा मोठा हिस्सा, ही भारताची बलस्थाने ठरतात. याच्या आधारावर भारतीय अर्थव्यवस्था भक्कमपणे उभी राहिल, असा विश्वास व्यक्त केला जातो. इतकेच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेला आधार देण्याची क्षमता भारताकडे असल्याचे दावे काहीजणांनी केले आहेत. म्हणूनच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या आणि जगभरातील प्रमुख देश देखील भारताबरोबरील आपले सहकार्य अधिकाधिक प्रमाणात विकसित करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसते. जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चिततेच्या काळात भारताला आंतरराष्ट्रीय गुंतवणूकादर, जागतिक उद्योगक्षेत्र व प्रमुख देशांच्या आर्थिक पातळीवरील सहकार्याचा फार मोठा लाभ मिळू शकतो. याने भारताचे आर्थिक व राजकीय महत्त्व अधिकच वाढणार असल्याचे दिसू लागले आहे.

English हिंदी

leave a reply