भारतीय औषधांची “संजीवनी” ब्राझीलच्या नागरिकांचा जीव वाचवील

- ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची कृतज्ञता

ब्राझिलिया – हनुमंताने दिव्य संजीवनी औषधी आणून श्रीरामांचे बंधू लक्ष्मण यांचे प्राण वाचविले अगदी तसेच भारताने पुरविलेल्या औषधांमुळे ब्राझीलच्या नागरिकांचा जीव वाचेल, अशा शब्दात ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी भारताचे आभार मानले. हनुमान पोर्णिमेच्या दिवशीच हनुमंताने हिमालयातून आणलेल्या संजीवनी औषधीचा उल्लेख करून ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी फार मोठी समयसूचकता दाखविल्याचे दिसत आहे. अजूनही कोरोनाव्हायरसच्या साथीवर औषध सापडलेले नाही. मात्र मलेरियाच्या रुग्णांसाठी वापरले जाणारे हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर करून जगभरातील डॉक्टरांनी कोरोनाव्हायरसच्या रुग्णांना बरे केल्याची कित्येक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे हायड्रोक्सीक्लोरोक्वीनला असलेली मागणी वाढते आहे, याची सर्वाधिक प्रमाणात निर्मिती करणाऱ्या भारताकडे सारे जग मोठ्या आशेने पाहत आहे.

इतर देशांबरोबरच भारताने ब्राझीललादेखील हायड्रोक्सीक्लोरोक्वीन व इतर औषधांचा पुरवठा केला आहे. यावर कृतज्ञता व्यक्त करताना ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी रामायणातील संजीवनी बुट्टीच्या कथेचा संदर्भ दिला. हनुमंतांनी वेळेतच संजीवनी आणून देऊन लक्ष्मणांचे प्राण वाचविले होते, त्याची आठवण करून देऊन बोल्सोनारो यांनी भारताने पाठविलेल्या औषधांचे महत्व अधोरेखित केले.

दरम्यान, भारताने श्रीलंकेलाही सुमारे दहा टन इतक्या प्रमाणात औषधांचा पुरवठा केला आहे. या औषधांनी भरलेल्या बॉक्सवर भारताकडून “गिफ्ट फ्रॉम इंडिया” असे लिहिण्यात आले आहे. कोरोनाव्हायरस विरोधातील लढ्यात भारत फार मोठे योगदान देत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताचे स्थान अधिकच भक्कम होणार आहे.

leave a reply